Thu, Jan 17, 2019 04:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच मिनिटांचा उशीर जीवावर बेतला (व्हिडिओ)

पाच मिनिटांचा उशीर जीवावर बेतला (व्हिडिओ)

Published On: Dec 14 2017 7:37PM | Last Updated: Dec 14 2017 7:37PM

बुकमार्क करा

विरार : प्रतिनिधी 

शाळेत जाण्यासाठी पाच मिनिटांचा झालेला उशीर एका 10 वर्षीय चिमुरड्याच्या जीवावर बेतला असून, टँकरची धडक आणि हॉस्पीटलच्या टोलवाटोलवीने त्याचा बळी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
नालासोपारा पश्चिमेला राहणाऱ्या  निषाद गोविंद घाडी हा छेडा नगरातील यश कीर्ती विद्या मंदिरात भविष्याचे धडे गिरवीत होता. शनिवारी त्याला शाळेत सोडण्यासाठी त्याचे वडील गेले होते. मात्र, 5 मिनिटे उशीर झाल्यामुळे त्याला शाळेत प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे गोविंद घाडी यांनी त्याला आपल्या सोबत घेतले. दोघेही दुचाकीवरून पुर्वेला गेले. तीथे रस्त्यावर निषादला दुचाकीवर बसवून ते समोरच्या दुकानात मालाची डिलिव्हरी देण्यासाठी गेले.

त्याचवेळी भरधाव टँकरने निषादला जोरदार धडक दिली. ही घटना पाहणाऱ्या पादचाऱ्यांनी टँकरने बच्चेको उडाया असा गलका करून चालकाला पकडून ठेवले होते. हा गलका आणि जमाव पाहून घाडी दुकानाबाहेर आले. जमावाला पांगवून वाट काढत ते आपल्या दुचाकीजवळ पोहोचल्यावर निषाद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्यांनी निषादला उपचारासाठी जवळच्या लक्ष्मी नारायण रुग्णालयात नेले. तीथे उपचार न करता त्याला विजयनगर येथील महापालिकेच्या हॉस्पीटल मध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला.

महापालिकेच्या हॉस्‍पिटलमध्ये नेल्यावर तीथेही पश्चिमेकडील दंडवते हॉस्पीटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला. दंडवतेंनीही उपचार न करता रिद्धी विनायक हॉस्पटीलमध्ये नेण्याचा सल्ला घाडी यांना दिला. सकाळी 10 वाजता जखमी झालेल्या निषादवर उपचार करण्यासाठी त्याचे वडील वेड्यासारखे भटकत होते. दुपारी अडीच वाजेपर्यंत त्यांना कोणताही वैद्यकिय मदत मिळाली नाही. त्यामुळे निषादची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. निषादचा बळी नेमका कोणी घेतला. 5 मिनीटांचा उशीर झाल्यामुळे निषादला प्रवेश नाकारणारी शाळा, बेताल टँकर चालक की हॉस्पीटल यापैकी दोषी कोण? याचा जाब प्रशासनाला विचारण्यात येत आहे. या घटनेमुळे वसई तालुक्यातील शिक्षण, वाहतुक, आरोग्य आणि प्रशासनाची बाजु पुन्हा एकदा उघडी पडली आहे.