Sat, Jul 20, 2019 11:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळ्या जादूने बरे करण्याच्या नादात आईने घेतला मुलीचा बळी

काळ्या जादूने बरे करण्याच्या नादात आईने घेतला मुलीचा बळी

Published On: Dec 20 2017 8:17PM | Last Updated: Dec 20 2017 8:17PM

बुकमार्क करा

विरार : प्रतिनिधी

आपल्या आजारी मुलीला रुग्णालयात नेण्याऐवजी काळ्या जादूने तिला बरे करण्याच्या प्रयत्नात तिच्या आईनेच तिचा जीव घेतल्याची घटना आजच्या विज्ञान युगात घडली आहे. विशेष म्हणजे ही घटना कोणत्याही दुर्गम किंवा अतिदुर्गम भागात घडलेली नाही तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार मध्ये घडली आहे. या घटनेने आपण खरच प्रगत झालो आहोत का? आपला विकास होत आहे का? याचा प्रत्येकानेच विचार करण्याची वेळ आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विरार पूर्व मनवेलपाडा येथील आई जीवदानी प्रसन्न इमारतीत अंबाजी भेकरे (वय 35) हे आपली पत्नी मिनाक्षी (30) व दोन मुलांसह राहतात. मिनाक्षी यांची बहिण माधुरी शिंदे (32) हेही त्यांच्याकडे रहायचे. त्यांची 11 वर्षीय मुलगी सानिया हिला शौचाचा त्रास होता. तिला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी तिच्यावर घरगुती उपचार करण्यात येत होते. या उपचारांनी तिला गुण येत नव्हता. शनिवारी रात्री आई मीनाक्षी हिने माझ्या अंगात देवी आली आहे, मी आता सानियाला पूर्णपणे बरी करणार असे सांगून, तिच्या अंगावर हळद-कुंकू टाकले आणि तिच्या अंगावर बसून तिचे पोट दाबू लागली. सानियाने गडबड करु नये, म्हणून तिची मावशी माधुरी हिने तिचे हात-पाय पकडले आणि मिनाक्षीने तोंड दाबून धरले. त्यात सानियाचा गुदमरुन मृत्यू झाला. यावेळी तिचे वडिल व भाऊ ( वय14) तेथे उभे होते. सानियाची हालचाल बंद झाली. तेव्हा ती आता उठून बसेल, असे सांगत मिनाक्षीने सानियाच्या मृतदेहाजवळच पूजा करण्यास सुरुवात केली, पण सकाळपर्यंत सानिया न उठल्याने त्यांनी तिला खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून ती मृत्यू पावल्याचे सांगितले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करुन मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. तेथून तिचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा अहवाल येताच पोलिसांनी पुन्हा मृत सानियाच्या आई, वडिल व मावशीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वडिलांनी घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन भादविक कलम 302, 202 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बळीराम बनकर हे फिर्यादी बनले आहेत. या तिघांनाही वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर करीत आहेत.