Mon, Jun 24, 2019 16:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चोरांपासून सुटकेसाठी दुकानांच्या छताला लावल्या जाळ्या

स्वरक्षणासाठी सरसावले गावकरी

Published On: Dec 07 2018 8:23PM | Last Updated: Dec 07 2018 6:47PM
विरार : प्रथमेश तावडे 

सीसीटीव्ही लावण्यापासून ते अगदी सेफ्टी दरवाजा बसविण्या पर्यंतच्या अनेक शक्कल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी लढवल्याच्या  पाहिल्या आहेत. मात्र विरार येथील पारोळ गावात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे त्रस्त दुकानदारांनी आपल्या दुकानाला चोरीपासून वाचविण्यासाठी  वेगळी शक्कल लढविली आहे. त्यांनी सुरक्षतेसाठी दुकानाच्या छताला चक्क लोखंडी जाळ्या लावल्या आहेत.  गावातील सर्वच दुकानदाराने आपल्या दुकानात चोरी होऊ नये म्हणून या जाळ्या लावण्यात आला असल्याचे सांगितले. 

विरारमधील पारोळ गाव हे शहरापासून जवळ-जवळ २० किमी लांब आहे. तसेच या गावापासून ६ ते ७ किमी अंतरावर पोलिस चौकी आहे. या गावात मागील वर्षभरापासून सतत चोरीच्या घटना वाढत होत्या. पोलिस गस्त नसल्याने आणि महामार्गावर गाव असल्याने चोऱ्या सतत होत होत्या. सतत पोलिसांना सांगून सुद्धा चोरीच्या घटना कमी होत नव्हत्या. म्हणून दुकानदारांनी स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या दुकानाच्या छताला लोखंडी जाळ्या लावल्या. 

 या गावात मागील वर्षभरात ३० ते ४० चोऱ्या झाल्या आहेत. यानंतर गावाच्या वेशीवर ६ महिन्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते . पण ते कधीच सुरू झाले नाही. यामुळे आता गावकरीच आपल्या सुरक्षतेसाठी सरसावले आहेत. गावातील बहुतांश दुकाने ही सिमेंटच्या पत्र्याची असल्याने चोरी सहज होते. पण आता या जाळ्या लावल्याने चोरीच्या घटनांना आळा बसला आहे. 

याविषयी काही नागरिकांनी दिलेल्‍या प्रतिक्रिया :

स्थानिक रहिवासी डॉ.परशुराम पाटील यांची प्रतिक्रिया :

"गावात मोठया प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिस केवळ घटना झाल्यावर पंचनामा करण्यासाठी येतात. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविणे गरजेचे आहे. पोलिस गस्त नसल्याने येथील दुकानदाराने छताला लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. " 

दुकानदार असलेल्‍या एकता म्हसकर यांची प्रतिक्रिया :

आमच्या दुकानात मागील वर्षात ५ते६ वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. सर्व चोऱ्या या दुकानाचे पत्रे फोडून केल्या आहेत त्यावर आळा बसविण्यासाठी आम्ही सर्व दुकानदारांनी छताखाली लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. 

दुकानदार असलेल्‍या भरत पाटील यांची प्रतिक्रिया :

पारोळ येथील नाक्यावर सर्व दुकाने ही पत्र्याची आहेत. चोरट्याना सहज हे पत्रे फोडून चोरी करता येते म्हणून आम्ही दुकानदारांनी जाळ्या लावून घेतल्या आहेत.हा प्रयोग केल्यावर चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत.