होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई उपनगरांत बंदला हिंसक वळण

मुंबई उपनगरांत बंदला हिंसक वळण

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:08AM

बुकमार्क करा
मुंबई/घाटकोपर : प्रतिनिधी

दलित संघटनांनी महाराष्ट्रभर केलेल्या बंदचा मोठा फटका मुंबई उपनगराला बसला. ठिकठिकाणी उतरलेल्या आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. चेंबूर-गोवंडत शंभरहुन अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. रेल्वेसेवाही काही काळासाठी विस्कळीत झाली होती. जमावाला पांगवताना खारदेवनगर, आनंदनगरात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात गोवंडी पोलीस ठाण्यातील 14 पोलीस जखमी झाले.

चेंबूर, गोवंडी, मानखुर्द भागातील दुकाने आंदोलकांनी बंद करून रस्तारोको करण्याचा प्रयत्न केला. सकाळी सहाच्या दरम्यान आरसीएफ कॉलनीबाहेर स्कूलबसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर चेंबूर नाका येथील आरसी मार्गावर सकाळी साडेअकरा वाजता तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दहा ते बारा जणांच्या जमावाने बेस्ट बसच्या काचा फोडून पळ काढला. 

लल्लुभाई कंपाऊंड, पीएमजी कॉलनी, एएमआरडीए वसाहत, मानखुर्द स्थानक, महाराष्ट्रनगर, म्हाडा वसाहत परिसरात  आंदोलकांनी निदर्शने करून मानखुर्द-वाशी दरम्यानच्या रस्त्यावर रास्तारोको केला. अशीच स्थिती पांजरापोळ सर्कल येथे होती. चारशे ते पाचशेचा जमाव रस्त्यावर उतरल्याने सायन - पनवेल मार्ग, फ्रीवे, चेंबूर कॅम्प रस्त्यावरील वाहतूक चार तास ठप्प होती. यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांनी ठाणे-सुमननगर दरम्यानची वाहतूक बंद केली. खारदेवनगर, आनंदनगर, अशोकनगर, लुम्बिनी बाग येथे बंदला हिंसक वळण लागले. त्यानंतर आदोलकांनी सुभाषनगर येथील 35 ते 40 गाड्यांच्या काचा फोडून एन. जी. आचार्य मार्गावर बंद असलेल्या दुकानांची तोडफोड केली. या मार्गावर काचा,  दगडांचे ढीग पाहायला मिळत आहेत. आनंदनगर व खारदेवनगर येथे रात्री उशिरापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

बंदला हिंसक वळण लागू नये म्हणून मुलुंड पोलिसांनी फ्लॅग मार्च काढून वातारण शांत करण्याचा सकाळी प्रयत्न केला. उपनगरातील चेंबूर, गोवंडीसोबतच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, पवई विभागात तीव्र पडसाद उमटले. माता रमाबाई नगर, विक्रोळी येथे आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. घाटकोपर, असल्फा  मेट्रो स्थानकात आंदोलन करत मेट्रो व्यवस्था ठप्प करण्यात आली. मुलुंड, भांडुप , कांजूरमार्ग, घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द स्थानकात उतरुन मध्य आणि हार्बर लोकल व्यवस्था ठप्प करण्यात आली. कांजूरमार्ग स्थानकाचे मोठे नुकसान करण्यात आले.पवई, घाटकोपर तसेच उपनगरातील काही विभागात जाळपोळ करण्यात आली. बेस्टच्या बस, इतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. विक्रोळी दंडाधिकारी न्यायालय परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. दगडफेकीत जखमी झालेल्या रुग्णांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.