Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र बंदला हिंसक वळण!

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण!

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले. पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, लातूरसह विविध भागांत जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. या बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यातील व्यवहार ठप्प पडले होते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत बंद नव्हता. तरीदेखील या ठिकाणी अनेक भागांत दुकाने बंद ठेवण्यात आल्याने बंदचे वातावरण होते.

राज्य सरकारच्या वतीने नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, या आश्‍वासनाने मराठा समाजाचे समाधान झालेले नाही. त्यामुळे 9 ऑगस्ट क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. या बंदसाठी आचारसंहिताही जाहीर करण्यात आली होती. परंतु, सकाळी शांततेत सुरू झालेल्या या बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याने या बंदला गालबोट लागले.

दारणात युवकाचा जलसमाधीचा प्रयत्न

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्‍नरफाटा येथे रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याचदरम्यान चेहेडी, पंपिंग परिसरातील युवक व महिलांनीही चेहेडी येेथे रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. याचदरम्यान दत्तू शिंदे या युवकाने नाशिक-पुणे चेहेडी  दारणा नदीपात्रात जलसमाधी घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिकमध्ये मराठा बांधवरस्त्यावर 

सकल मराठा समाजातर्फे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर गुरुवारी (दि. 9) करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला काहीसे गालबोट लागले. मराठा बांधवांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांना हाकलून दिले. माजी आमदार माणिक कोकाटे यांनाही धक्‍काबुक्‍की करण्यात आली. या सर्व घडामोडीत दोन ते तीन गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या मुख्य भागातून मोर्चा काढत दुकाने बंद केली. ग्रामीण भागातही विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

दुकाने बंद करण्याचे आवाहन

मोर्चादरम्यान गंगापूर रोेड, मेहेर चौक, रेडक्रॉस, शालीमार आदी भागांतील दुकाने बंद करण्याचे आवाहन मोर्चेकर्‍यांंनी केले. या सर्व घटनेमध्ये गंगापूर रोडवरील मविप्र चौकातील एक मेडिकल बंद करण्यासाठी मोर्चातील काही तरुणाई पुढे सरसावली. मात्र, इतर बांधवांनी त्यांना वेळीच सावरत मेडिकल बंद करू नका, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला. रेडक्रॉस, शालीमार चौकातही दुकाने बंद करण्यावरून आंदोलनकर्ते व पोलिस यांच्यात शाब्दिक वाद झाला.

विदर्भात प्रतिसाद

सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी आयोजित नागपूरसह विदर्भात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोंदिया, वाशिम येथे आंदोलकांनी जाळपोळ व तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अकोला, वाशिम येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर नागपूरमध्ये मानकापूर परिसरात धावत्या रेल्वेसमोर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या चार युवकांना पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून वाचविले. नागपूर महापालिकेच्या टाऊन हॉल परिसरात राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना, मराठ्यांना आरक्षण द्यावे, या मागणीसाठी घेराव घातला.