Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीच्या महापौर पदी विनिता राणे

कल्याण-डोंबिवलीच्या महापौर पदी विनिता राणे

Published On: May 09 2018 2:04PM | Last Updated: May 09 2018 2:04PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेची महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी बुधवारी निवडणुकीच्या दिवशी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले. यात शिवसेनेच्या विनिता राणे यांच्या गळ्यात महापौर पदाची तर भाजपच्या उपेक्षा भोईर यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली. राणे या तेराव्या महापौर ठरल्या आहेत. आज (बुधवार) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक झाली. त्यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

महापौरपदासाठी शिवसेनेकडून विनिता राणे आणि उपमहापौरपदासाठी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांनी एकत्रित आपापले उमेदवारी अर्ज महापालिका सचिव संजय जाधव यांना सादर केले होते. परंतु, शिवसेना सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अर्ज सादर करणाऱ्या भोईर यांनी महापौरपदासाठी देखील अर्ज भरला आणि तो सचिव जाधव यांना सुपुर्द केला. प्रारंभी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना भाजपामध्ये युतीचे चित्र दिसून आले असताना काही वेळातच घडलेल्या नाट्यमय घडामोडी चर्चेचा विषय ठरल्या. 

याच दरम्यान महापौरपदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उपेक्षा भोईर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे कासिफ तानकी हे दोघेही आपला अर्ज मागे घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी केला होता. उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर भोईर आणि तानकी यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते तर दुसरीकडे भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी मात्र  निवडणुकीच्या वेळीच काय तो निर्णय होईल असे सांगत वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

अखेर निवडणुकीच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. 

यावेळी सेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी केणीकर, आमदार सुभाष भोईर, तर भाजपचे कोणतेही मोठे नेते उपस्थित नव्हते. निवडणूक कायर्क्रमावेळी मनसेचे नगरसेवक सभागृहात गैरहजर होते. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीत अचानक शिवसेना-भाजपमध्ये झालेला दुरावा या निवडणुकीत दिसून आला नाही. महापौरपदाची माळ विनिता राणे यांच्या गळ्यात पडताच कोकणी समाज्यासह मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags : Vinita Rane, Mayor, Kalyan-Dombivli municipal corporation