Thu, Aug 22, 2019 12:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वांद्य्रात विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारक

वांद्य्रात विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारक

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांचे राष्ट्रीय स्मारक वांद्रे (पूर्व) येथील चेतना महाविद्यालयात उभारण्यात आले आहे. या स्मारकाराचे उद्घाटन ज्येष्ठ मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यानिमित्त चेतना महाविद्यालयात विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

चेतना महाविद्यालयाने उभारलेल्या या स्मारकात विंदा करंदीकर यांना प्राप्त झालेली सन्मानचिन्हे, पुरस्कार, त्यांच्या जीवनातील विविध क्षण टिपणारी अनेक छायाचित्रे यांची मांडणी करण्यात आली आहे. विंदा करंदीकरांच्या जीवनावरील कार्यक्रम, माहितीपट, काव्यवाचनाचे कार्यक्रम यांच्या ध्वनिफिती व चित्रफिती या स्मारकात आहेत. तसेच विंदांचे सर्व प्रकाशित साहित्य, तसेच त्यांच्याविषयी लिहिली गेलेली पुस्तके व नियतकालिकांतील लेखन यांचाही संग्रह या स्मारकात करण्यात आला आहे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता स्मारकाचे उद्घाटन झाल्यानंतर भालचंद्र नेमाडे यांचे पहिले विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान होणार आहे. 

विंदा करंदीकर यांचे 2017-2018 हे जन्मशताब्दी वर्ष होते. त्याची सांगता  23 ऑगस्ट रोजी होत आहे.  विंदा करंदीकर यांच्या कवितेवर आधारित काव्यदिंडीचे आयोजन सकाळी 9.30 वाजता करण्यात आले आहे. विंदा करंदीकर वांद्रे (पूर्व) येथील साहित्य सहवास येेथून ही काव्यदिंडी चेतना महाविद्यालयात काढण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता चेतना शिक्षण संस्थेच्या सभागृहात विंदा करंदीकर यांचे साहित्य व जीवन यावर आधारित विंदांजली हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाला लेखिका विजया राजाध्यक्ष, प्रकाशक रामदास भटकळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुंबईतील साहित्यरसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेवेळी केले आहे.