Fri, Jun 05, 2020 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचे नाव बँजो पार्टी ठेवा; विखे-पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

भाजपचे नाव बँजो पार्टी ठेवा; विखे-पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: Mar 01 2018 9:24AM | Last Updated: Mar 01 2018 9:22AMमुंबई : पुढारी ऑनालाईन

राज्याचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री एका चित्रफितीत नाचत असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तही त्यांच्यासोबत सामिल होतात. हे सरकार म्हणजे एक नाटक कंपनीच झाली आहे. त्यामुळे आता भाजपचे नाव बदलून बँजो पार्टी ठेवा, असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत बोलताना लगावला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना विखेपाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेव्ह रिव्हर अँथेमच्या चित्रफितीवरून सरकारला चांगलेच लक्ष केले. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत गरजा व प्रश्‍नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही. मुख्यमंत्री राज्यातील प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करतात तसेच अर्थमंत्री मुनगंटीवारांचेही जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष सुरू आहे. पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांना सोबत घेतले मग शिवसेनेच्या मंत्र्यांना का घेतले नाही, अशी विचारणा त्यांनी केली.

मुंबईतील नदी शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करणारी ध्वनिचित्रफीत ही शासनाने किंवा शासनाच्या कोणत्याही विभागाने तयार केलेली नाही. नदी शुद्धीकरण  क्षेत्रात काम करणार्‍या रिव्हर मार्च या अशासकीय संस्थेने ती तयार केली आहे. त्याचा शासनाशी कोणताही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री
कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांची चित्रफीत प्रसिद्ध होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर जोरदार टीक करण्यास सुरूवात केली होती. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने ही चित्रफित टी-सिरिजने तयार केलेली नाही. टी-सिरिजचे युट्युब फॉलोअर्स अधिक असल्याने केवळ युट्युबवर अपलोड करण्यासाठी त्यांना दिला. शासनातर्फे या व्हीडिओवर कोणताही निधी खर्च झालेला नाही आणि त्याचा कुठल्याही विभागाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे.

कुठल्याही सामाजिक उपक्रमात नागरिकांना आवाहन करण्याची विनंती संबंधित संस्थेने केली, तर मुख्यमंत्री त्याला होकार देतात. अनेक माध्यमांच्या वतीने सुद्धा विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात आणि अशा प्रत्येकवेळी मुख्यमंत्री त्यात सहभागी होतात. मुंबईतील नद्या स्वच्छ करण्यासाठी ईशा फाऊंडेशन, रिव्हर मार्च अशा अनेक संघटनांनी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्य प्रारंभ केले आहे. या अभियानाला गती देण्यासाठी आणि त्यादृष्टीने जनजागरण व्हावे, यासाठी एक ध्वनीचित्रफीत रिव्हर मार्च या संस्थेतर्फे करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.