Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्या पटवर्धन, रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार

विद्या पटवर्धन, रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 26 2018 1:51AMमुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणारे यंदाचे पुरस्कार बाल रंगभूमीसाठी निस्वार्थी भावनेने आयुष्य वेचणार्‍या विद्या पटवर्धन आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासह 38  पुरस्कारांची घोषणा नाट्य परिषदेने गुरुवारी केली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दादर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नाट्य परिषदेतर्फे व्यावसायिक नाटकांसाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारांमध्ये संगीत देवबाभळीने बाजी मारली असून मत्स्यगंधा, वेलकम जिंदगी, अनन्या या नाटकांनाही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रायोगिक रंगभूमीवरील आणि शेवटी प्रार्थना या नाटकाला पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. संगीत रंगभूमीवरील संगीत पंडितराज जगन्नाथ या नाटकाचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. 

ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलाकार कीर्ती शिलेदार या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष आहेत. जूनमध्ये आयोजित या नाट्यसंमेलनासाठी टी फॉर थिएटर आणि टी फॉर ट्रंक अशी संकल्पना निर्धारित करण्यात आली असून या माध्यमातून मराठी रंगभूमी ज्या रंगमंच कामगारांच्या आधारावर बहरली आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आहे. केवळ व्यावासायिक नाटकेच नाही तर लावणी, झाडीपट्टी, नमन, दंडार याचेही सादरीकरण या संमेलनामध्ये करून तरुण रंगकर्मींना आणि रसिकांना या लोककलांचाही अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.

नाट्यसंमेलन चालणार विनाखंड सलग 60 तास  

मुलुंड येथील महाकवी कालिदास नाटय संकुलात 13 ते 15 जून दरम्यान होऊ  घातलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनातील विविध समारंभ, कार्यक्रम विनाखंड सलग 60 तास चालणार आहेत. हे यंदाच्या संमेलनातील प्रमुख नावीन्य असणार आहे. आतापर्यंतच्या नाट्यसंमेलनाची परंपरा मोडीत काढत यंदाचे नाट्यसंमेलन वैविध्यपूर्ण पद्धतीने आयोजित करण्याचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा मानस आहे. 13 जून रोजी दुपारी 4 वाजता नाट्यदिंडीने सुरू होणारा हा महाअंक 16 जूनच्या पहाटे चारपर्यंत सुरू राहील.