Sat, Mar 23, 2019 00:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना-भाजपचा प्यार का वादा आधा-आधा

शिवसेना-भाजपचा प्यार का वादा आधा-आधा

Published On: May 03 2018 1:53AM | Last Updated: May 03 2018 1:46AMमुंबई : उदय तानपाठक

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत आगपाखड करणार्‍या शिवसेनेने प्रत्यक्षात या महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेच्या सहा जागांपैकी दोघेही तीन-तीन जागा लढवणार आहेत. शिवाय पालघरला  लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तटस्थ राहण्याचा विचार शिवसेनेत सुरू असल्याचे समजते. हाच फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला विधानसभेच्या निवडणुकीतही असेल, तर युती कायम ठेवण्याचा सेना नेतृत्वाचा इरादा असल्याचे समजते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात मोहीमच सुरू केली आहे. स्वतःचा पक्ष ज्या सरकारमध्ये सहभागी आहे, त्या सरकारला निकम्मे सरकार संबोधण्यापर्यंत उद्धव यांच्या भाजपात्वेषाची मजल गेली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्याचे रणशिंग शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात फुंकण्यात आले आहे. प्रत्यक्षात आता याच महिन्यात होणारी विधान परिषदेच्या सहा जागांसाठीची निवडणूक भाजपच्या हातात हात घालून लढवण्याचे शिवसेनेने ठरविल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

सहा जागांपैकी प्रत्येकी तीन जागा लढवाव्यात, असे शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांनी ठरविले आहे. अलीकडेच याबद्दल दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. त्यात हा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी हिंगोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असून अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली भाजपकडे राहणार आहे. शिवसेना सातत्याने विदर्भात ताकद असल्याचा दावा करते. परंतु, तिथल्या दोन्ही जागा भाजपला देऊन या दाव्यावरच सेनेने प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. 

अमरावतीतून भाजपकडून राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उस्मानाबाद-लातूर-बीडमधून सुरेश धस आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून भाजपचे प्रदेश संघटन सचिव रामदास आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. लातूर-उस्मानाबाद-बीडमधील भाजपचे प्रभावी नेते रमेश कराड यांनी कालपरवाच राष्ट्रवादीत प्रवेश करून त्या पक्षाचे तिकीटदेखील मिळवले आहे. आता काँग्रेसकडे असलेल्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख गुरुवार 3 मे ही असून, 21 मे रोजी मतदान होणार आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर  पालघर आणि गोंदिया-भंडारा या लोकसभा मतदार संघात होणार्‍या पोटनिवडणुकीत काय होणार? हा सवाल मात्र कायम आहे. या दोन्ही जागा भाजपकडेच आहेत. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे, तर गोंदिया-भंडार्‍याचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने त्या रिक्‍त झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख या दोन्ही जागा लढण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पण भाजपला पाठिंबा दिला, तर विधानसभेत स्वबळावर लढावे लागले, तर कोंडी होऊ शकते, त्यामुळे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तटस्थच रहावे, असा विचार शिवसेनेच्या नेतृत्वाने सुरू केल्याचे समजते. विधान परिषदेप्रमाणेच विधानसभेतही भाजपने हा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला मान्य केला, तर मात्र युतीचा वादाही पुढे चालेल, असे दिसते!

Tags : Mumbai, mumbai news,  Vidhan Parishad election issue,  BJP shivsena  decision to alliance,