Tue, Nov 20, 2018 00:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत उपराष्ट्रपती नायडू करणार पोलिसांसमवेत योगा

मुंबईत उपराष्ट्रपती नायडू करणार पोलिसांसमवेत योगा

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुवारी मुंबईत शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयांसोबतच सर्व शासकीय कार्यालयांमध्येही योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर खासगी आस्थापनांनीदेखील योगाची शिबिरे आयोजित केली आहेत. वांद्रे पश्चिम येथे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या योग कार्यक्रमाला देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास उपस्थिती राहणार आहे. मुंबईकरांची 24 तास सेवा करणार्‍या महापालिका व पोलीस कर्मचार्‍यांसोबत हे मान्यवर योगा करणार आहेत.

शिक्षकांनी या दिवसापासून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून द्यावे, शाळांत उपलब्ध असलेल्या हॉल आणि मोकळ्या शेडमध्ये योगदिन साजरा करावा, योगा उत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने योग दिनाचा अहवाल प्रत्येक शाळांकडून मागविला आहे. 

गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रम

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पतंजली योग व मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी जागतिक योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 7 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिव्याज फांऊडेशन तर्फे नॅशनल स्पोर्टस कलब ऑफ इंडिया, लाला लजपतराय वरळी येथे सकाळी 10.00 वा. योगा दिन साजरा होणार आहे. सदर कार्यक्रमास गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिक, याबरोबरच सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.