Tue, Jul 16, 2019 10:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेम वाढवण्यासाठी संगीताचा वापर व्हावा

प्रेम वाढवण्यासाठी संगीताचा वापर व्हावा

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 1:14AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

संगीतामध्ये प्रत्येक चिंतेचे विस्मरण करण्याची शक्‍ती असते. संगीत हा एकमेकांना बांधणारा दुवा आहे. संगीतामध्ये परस्परांमधील प्रेम व राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याची क्षमता आहे व त्याचा वापर करण्याची गरज आहे. मोहम्मद रफी यांचे पूर्ण आयुष्य संगीतासाठी वाहिलेले होते, ते गंधर्वाचे अवतार होते, त्यांचे गीत अजरामर आहे, अशा शब्दांत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रफी यांना आदरांजली वाहिली. मोहम्मद रफी यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त स्पंदन आर्टतर्फे दहावा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्तर देण्यात आला. ठाकरे यांच्या पत्नी कुंदाताई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर, गायिका पूनम श्रेष्ठा यांना मोहम्मद रफी पुरस्काराने गौरवण्यात आले. नायडू यांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, रफी यांच्या कन्या यास्मिन व नसरीन, कार्यक्रमाचे आयोजक मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशीष शेलार, अ‍ॅड. प्रतिमा शेलार उपस्थित होते. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे रफी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. ठाकरे यांना एक लाखांचा धनादेश व स्मृतिचिन्ह, तर श्रेष्ठा यांना एकावन्‍न हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

उपराष्ट्रपतींच्या खुसखुशीत भाषणाला श्रोत्यांकडून मोठ्या टाळ्या मिळत होत्या. छुप्या प्रतिभेला ओळखणे व त्याला प्रोत्साहन देणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आपण राजकारणातून निवृत्त झालो असलो तरी सार्वजनिक जीवनात कार्यरत आहोत, म्हणून या संस्मरणीय कार्यक्रमाला आवर्जून आल्याचे ते म्हणाले. ठाकरे कुटुंबीयांचे कलेमध्येदेखील मोठेे योगदान आहे. संगीत हे सर्व आजारांवर सर्वाधिक प्रभावी औषध असल्याचा उल्लेख त्यांनी केला. संगीताला कोणत्याही सीमेचे बंधन नसते. संगीतामध्ये एकत्र आणण्याची शक्‍ती असते. संगीताचा कोणताही धर्म, जात नसते.

समाजातील कुप्रथा रोखण्यासाठी संगीताचा वापर करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्‍त केली. धर्म ही पूजा पद्धती असून संस्कृती ही जीवनपद्धती आहे. सध्या पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण केले जात आहे.

मात्र, आपल्या थोर संस्कृतीकडे पुन्हा वळण्याची वेळ आली आहे. राजकारण करताना पैसा, जात, समाज यांचा वापर करण्याऐवजी चारित्र्य, क्षमता आदींना महत्त्व मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. रफी थोर व महान व्यक्‍तिमत्त्व असतानाही नेहमी विनम्र राहिले, असे नायडू म्हणाले. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व समान असून काही जणांनी स्वार्थासाठी जातीय विषमता केल्याची टीका त्यांनी केली. सामाजिक सद्भावनेसाठी संगीताचा चांगला वापर केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.