Tue, Oct 24, 2017 16:57
29°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलगुरू देशमुखांनी घडवला नवा इतिहास

कुलगुरू देशमुखांनी घडवला नवा इतिहास

Published On: Aug 13 2017 2:08AM | Last Updated: Aug 13 2017 1:52AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राजभवनने दिलेल्या मुदतीत पेपर तपासणी न झाल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात अशी कारणे दाखवा नोटीस मिळणारे देशमुख हे पहिले कुलगुरू आहेत.

 मुंबई विद्यापीठाच्या 150 वर्षांच्या कारकिर्दीतले ते 54 वे कुलगुरू आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या कामातील दिरंगाईमुळे कुलपतींकडून नोटीस मिळणारे ते पहिले कुलगुरू आहेत.   एप्रिल आणि मेमध्ये झालेल्या सर्व परीक्षांचे निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याने तातडीने त्यांना राज्यपालांनी 1 ऑगस्टला ही नोटीस पाठवली,  त्यानंतर लगेच देशमुख रजेवर गेले आहेत. उत्तरपत्रिका ऑनस्क्रीन तपासण्याच्या देशमुख यांच्या निर्णयामुळे निकाल रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात आले आहे. 4 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम 11(14) आणि 89 मधीर तरतुदींचा आधार घेत ही नोटीस बजावण्यात आली आहे. कुलगुरूंना पुरेशी संधी देण्यात आली होती. 

मार्च-एप्रिल महिन्यापासून ही समस्या सुरू होती, तरीही कोणतीही आवश्यक पावले उचलण्यात आली नाहीत. राज्यपालांसोबत झालेल्या पहिल्या बैठकीतच कुलगुरूंना सर्व निकाल दिलेल्या वेळेत लावण्याबाबत आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळेत निकाल लावण्यासंदर्भात हालचाली न केल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे. जर राज्यपाल देशमुख यांच्या खुलाशाने समाधानी नसतील, तर ते कुलपती म्हणून त्यांच्या अधिकारात कुलगुरूंना पदावरून हटवू शकतात. विद्यापीठ कायद्याच्या कलम 11(14) मध्ये तशी तरतूद असल्याने ही कार्यवाही होऊ शकते अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली.