Sat, Nov 17, 2018 02:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजाची ओबीसी निकषांवर पडताळणी!

मराठा समाजाची ओबीसी निकषांवर पडताळणी!

Published On: Sep 04 2018 8:05AM | Last Updated: Sep 04 2018 1:30AMमुंबई : दिलीप सपाटे 

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल मागविण्यात आला असून आयोगाकडून 15 नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल मिळणे अपेक्षित आहे. मराठा समाजाला कोणत्या प्रवर्गात आरक्षण द्यायचे हा निर्णय अद्यापि झाला नसला तरी आयोगाकडून ओबीसींसाठी असलेल्या निकषाच्या आधारे मराठा समाजाच्या सामाजिक परिस्थितीची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने सर्वेक्षणाअंती मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची शिफारस केली होती. याच अहवालाच्या आधारे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, हे आरक्षण न्यायालयात टीकू शकले नाही. 

आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपण सिध्द करणे गरजेचे असून सध्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाबरोबर सामाजिक मागासलेपणाचीही पडताळणी सुरु आहे. सर्वेक्षणात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके आणि या तालुक्यातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. सुमारे 45 हजार कुटुंबांची माहिती या सर्वेक्षणाव्दारे गोळा करण्यात आली आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचे संकलन करण्याचे कामही सुरु आहे.  

ओबींसी प्रवर्गात जातींचा समावेश करण्यासाठी जे निकष आहेत त्या निकषांच्या आधारे मराठा समाजाचे मागासलेपण आयोगाकडून तपासण्यात येत आहे. जी गावे आणि शहरी भागात सर्वेक्षण झाले त्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाची परिस्थिती काय? याची तौलानिक माहिती तपासली जात आहे. ओबीसी प्रवर्ग ठरविण्याबाबत जे राष्ट्रीय निकष आहेत तेच निकष हा अहवाल तयार करताना वापरण्यात येत असल्याची माहिती आयोगाच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली.