Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाज्यांचे भाव कडाडले!

भाज्यांचे भाव कडाडले!

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यभरातील शेतकर्‍यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळेे शेतीमालाची आवक 10 ते 15 टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. अगोदरच इंधन दरवाढीमुळे गोरगरीब-मध्यमवर्गीय हैराण असताना भाजीपाला महागल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. 

सरसकट कर्जमाफीसह शेतमालाला हमीभाव व व्यवस्थापन खर्च, शेतीपंपासाठी मोफत वीज यांसारख्या मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाच्या आवक घटल्याने मुंबईतील भायखळा येथील जुन्या भाजीपाला मंडईत शुकशुकाट दिसून आला. एकीकडे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांतील भाजीपाल्याची आवक कमी झाली असताना मात्र परराज्यांतून मात्र मालाची आवक सुरूच आहे.महाराष्ट्रातील भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे भाजीपाल्याचे  वाढू लागले आहेत असे भाजीपाला विक्रेत्यांडून सांगण्यात आले.

संपाचा फायदा छोट्या व्यापा-यांनी उचलला

देशव्यापी शेतकरी संपामूळे शेतमालाची घट होण्यापुर्वीच याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. मुंबई, ठाणे आदी महानगरांमध्ये संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर छोट्या व्यापा-यांनी 20 ते 30 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चटका बसत असला तरी छोट्या व्यापा-यांनी मात्र भाज्यांची आवक कमी झाल्याचा चांगलाच फायदा घेतल्याचे दिसून आले.