होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वीरपत्नींचा एसटीचा मोफत प्रवास सुरू

वीरपत्नींचा एसटीचा मोफत प्रवास सुरू

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:34AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्याची प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचा दावा राज्यपाल सी. विद्यासागर यांनी केला. एक प्रभावशाली, प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी शासनासोबत सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.  शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तानेही श्रमिकांना शुभेच्छा तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना राज्यपालांनी आदरांजली अर्पण केली. तसेच राज्यातही विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि निमसासकीय कार्यालयांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यानी हुतात्मा स्मारक येथे अभिवादन केले.

राज्य शासनाने राज्यामध्ये प्लास्टिक व थर्माकोलपासून बनविल्या जाणार्‍या उत्पादनांची निर्मिती, विक्री व वापर यावर बंदी घालण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदारांच्या महामेळाव्यात 12.10 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा अंतर्भाव असणार्‍या 4 हजार 106 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. तर लातूर येथे रेल्वे डब्यांच्या एका कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.  या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात 25 हजार इतक्या नोकर्‍या निर्माण होतील.  महाराष्ट्र हे भारतातील पहिले हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, असे गौरवोदगारही राज्यपालांनी यावेळी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव डी.के.जैन, माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, अपर मुख्य सचिव शाम लाल गोयल, प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.