Tue, Sep 25, 2018 09:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वासिंदमध्ये रेल रोको!

वासिंदमध्ये रेल रोको!

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 1:15AM

बुकमार्क करा

ठाणे/ वासिंद : प्रतिनिधी

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासूनच पसरलेल्या दाट धुक्यामुळे उपनगरी रेल्वेचे सकाळचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले आणि वासिंदकरांना रेल रोको आंदोलन करावे लागले. मेल, एक्स्प्रेससाठी लोकल स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्याने संतप्त प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वासिंद स्थानकावर सकाळी पावणे सातला रेल रोको करीत प्रशासनाचा निषेध केला. सुमारे दोन तासांच्या आंदोलनानंतर या स्थानकातून 8.45 वा.च्या सुमारास पहिली लोकल मुंबईसाठी रवाना झाली. त्या दरम्यान 11 लोकल रद्द करण्यात आल्या. 

ओखी वादळानंतर वातावरण कसे बदलू लागले आहे, याची प्रचिती येत आहे. शनिवारी पहाटेपासून दाट धुके पसरल्याने मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे 40 ते 50 मिनिटे उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या उशिरा येणार्‍या लोकलमुळे कार्यालयात वेळेत पोहचता येत नाही, त्यामुळे लेटमार्कला सामारे जावे लागते. असे असताना सकाळची 5.55 ची कसारा- सीएसटी लोकल ही आसनगांवला सहा वाजता आली. धुक्यामुळे ती लोकल स्थानकातच थांबवून चार मेल-एक्स्प्रेसला मार्ग मोकळा करून देण्यात आला. मुंबईकडे जाण्यासाठी लोकलची प्रतीक्षा करून संतप्त झालेल्या महिला प्रवाशांनी सुमारे पावणे सातच्या सुमारास मुंबईहून आलेल्या लोकलसमोर आंदोलन सुरू केले. आक्रमक झालेल्या महिलांना पाहून इतर प्रवाशांनी रेल रोको आंदोलनात उडी घेतली. त्यात स्टेशन मास्टरने तुमच्याकडे पास आहे का ? तुम्ही नियमित प्रवासी आहात का ? असे उद्धट उत्तर दिल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले. त्यामुळे पोलिसांची कुमक मागवावी लागली. डीवायएसपी प्रशांत कदम यांना जातीने घटनास्थळी पोहचावे लागले.