Tue, Jun 25, 2019 14:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खाडीतील भरावाने वसई-विरारला बुडवले!

खाडीतील भरावाने वसई-विरारला बुडवले!

Published On: Jul 22 2018 1:24AM | Last Updated: Jul 22 2018 1:04AMमुंबई : राजेश सावंत

वसई-विरार शहर महानगरपालिकेचा जन्म झाल्यानंतर या शहरात इमारती बांधण्याचा वेग 100 टक्क्यांनी वाढला आहे. इमारतीच्या उभारणीसाठी वसई, नालासोपारा व विरार भागातील खाडी व मोकळ्या जागेत राजरोसपणे टाकण्यात येणार्‍या दगड-मातीच्या भरावामुळे यंदाच्या पावसाळ्यात कधी नव्हे ते वसई-विरार शहर पाण्याखाली गेले. त्यात पर्जन्यजलवाहिन्यांची कमतरता, नालेसफाईकडे होणारे दुर्लक्ष व उभ्या राहणार्‍या अनधिकृत चाळी-इमारती व बांधकामे यामुळे येणार्‍या काळात वसई-विरार शहराचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सिडकोच्या ताब्यात असलेल्या वसई-विरार शहराची जबाबदारी आठ वर्षापूर्वी महापालिकेकडे आली आहे. या शहराचा कारभार हाकण्यासाठी सनदी अधिकारीही मिळाला. पण गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात ठोस उपाययोजना पालिका प्रशासनाकडे नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. इमारत बांधताना किती भराव असावा, मलनि:सारण वाहिनी, पर्जन्यजलवाहिनी या पायाभूत सुविधांकडे बिल्डरांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी भराव टाकून रस्ते उंच करण्यात आले आहेत. यावर उभ्या असणार्‍या इमारतींमुळे सोसायटीमधील पावसाळी व सांडपाणी रस्त्यावर येते. मध्यंतरीच्या काळात पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम उघडली होती. पण काही दिवसातच ही मोहीम थंडावली. याला राजकीय हस्तक्षेपही तितकाच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 380 चौरस किमी जागेत वसलेल्या या शहरातील बहुतांश खाडी व मोकळी जागा बुजवण्यात आली. 2017 मध्येही विरार ते नालासोपारा दरम्यान रेल्वे मार्गासह ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. पण या पाण्याचा 14 ते 15 तासांत निचरा झाला. यावेळी तब्बल तीन दिवस पाणी तुंबून राहिल्यामुळे शहराचे जनजीवनच ठप्प पडले होते. 

 विरार पश्‍चिमेला ग्लोबल सिटी, एकता, विरार गार्डन, अग्रवाल गार्डन आदीसारखी मोठ-मोठी गृहनिर्माण संकुलं उभी राहिली. त्या तुलनेत पर्जन्यजलवाहिनी, मलनि:सारण वाहिन्यांची वाढ झाली नाही. पालिकेला गेल्या आठ वर्षात 100 टक्के पर्जन्यजलवाहिन्या टाकणे शक्य नसले तरी, किमान 50 टक्के तरी काम करणे आवश्यक होते. पण शहरात 25 टक्केही पर्जन्यजलवाहिन्यांचे जाळे नाही. याला पालिकेच्या अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. शहरात तासाला 20 मिमी पाऊस झाला तरी, पाणी तुंबते. विरारच्या सेंट झेवियर्स स्कूलसह सप्तर्षी सोसायटी व  वसई, विरार, नालासोपारा भागातील 80 हून जास्त भागातील पाण्याचा दोन ते तीन दिवस निचरा होत नाही.

पश्‍चिम रेल्वेच्या कारशेडचाही फटका

विरार व नालासोपारा स्टेशन दरम्यान पाच वर्षापूर्वी खाडीत भराव टाकून पश्‍चिम रेल्वेने कारशेड उभारली. पण या कारशेडमुळे पाण्याचा निचरा थांबला. कारशेड बांधताना, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्यजलवाहिन्या व नाले बांधणे आवश्यक होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे रेल्वेमार्गातही पाणी तुंबू लागले आहे. 

5 कोटी 50 लाख रुपये खर्च करून नालेसफाई 

पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी मुंबई महापालिकेप्रमाणे येथेही नालेसफाईची कामे केली जातात. 2017-18 या आर्थिक वर्षात नालेसफाईसाठी 5 कोटी 50 लाख रुपये आर्थिक तरतूद करण्यात आली होती. तर 2018-19 या वर्षाकरिता 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

निरी व आयआयटी तज्ज्ञांची नियुक्ती 

वसई-विरार महापालिकेत पर्जन्यजलवाहिनी विभागाचा अभाव आहे. त्यामुळे आयआयटी व निरीच्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा कसा करता येईल, याचा अभ्यास करणार आहे. विरार-वसईला पाणी तुंबण्यामागे भरावही तितकाच कारणीभूत आहे. त्याशिवाय मिठागरच्या जागेपेक्षा शहरातील काही भाग सखल आहे. यावेळी तीन दिवसांत 1800 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबले. पण याचे प्रमाण अवघे 20 ते 25 टक्के होते. पण येणार्‍या काळात पर्जन्यजलवाहिन्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येणार आहे.

- सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका