Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसई, विरारसह नालासोपारा पाच दिवसांनंतरही पाण्यातच

वसई, विरारसह नालासोपारा पाच दिवसांनंतरही पाण्यातच

Published On: Jul 13 2018 1:28AM | Last Updated: Jul 13 2018 1:28AMवसई/विरार/नालासोपारा : प्रतिनिधी

गेले पाच ते सहा दिवस प्रलयंकारी पावसाने वसई तालुक्याला जबर तडाखा दिल्यानंतर बुधवारी पाऊस ओसरला असला तरी वसई, विरार, नालासोपारा या शहरांमध्ये अजूनही पाण्याचा निचरा  झालेला नसून अनेक निवासी भागांमधील रस्ते पाण्याखाली असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शहरातील वीज तसेच पाणीपुरवठाही पूर्ववत झाला नसून दूरध्वनी सेवाही कोलमडलेली आहे.

वसई पूर्वेत एव्हरशाईन सिटी ते वसई रेल्वे स्थानक पूर्व परिसरात साचलेले पाणी अद्याप ओसरले नाही. तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याच भागात पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा अंबाडी उड्डाणपूल आहे. त्या पुलाची एक बाजू धोकादायक झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली आहे.

वसई पूर्वेतील वसंत नगरी भागातही पाण्याचा निचरा झालेला नाही. येथे अजूनही गुडघाभर पाणी आहे. येथील औद्योगिक वसाहतीत बुधवारी वीज नसल्याने कारखाने बंद राहिले. गुरुवारी वीजपुरवठा सुरू झाल्यावर औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी कामावर जाण्यास निघाले. मात्र, पूर्व-पश्‍चिम जोडणारा अंबाडी पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने त्यांना 15 मिनिटांचे अंतर पार करण्यास तब्बल दोन तास लागले. या मार्गावर दरवर्षी किमान दोन दिवस पाणी साचते. मात्र, वसई-विरार महानगरपालिकेकडून अद्यापि कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. या पाण्यातून जाताना इंजिनात पाणी गेल्यामुळे अनेक वाहने रस्त्यातच बंद पडली. वाहनांच्या लागणार्‍या रांगा व त्यांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनाही  वाहतुकीचे नियमन करणे अवघड होत आहे. या रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास किमान 3 दिवस लागण्याची शक्यता आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील लक्ष्मी बेन छेडामार्ग,गास - सनसिटी, टोके पाडा ,नालासोपारा पोलीस ठाणे ,नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्टेशन ,अलकापुरी रोड अनेक सोसायट्यांमध्ये पाणी अजूनही कायम असून, मधुबन सोसायटीमध्ये तर अनेक रहिवासी आजारी पडले आहेत. वीज,पाणी,4 दिवसापासून बंद आहे.याठिकाणी कोणताही नगरसेवक,लोकप्रतिनिधी,महानगरपालिका प्रशासनाचे कोणीही इकडे फिरकले नाही असा आरोप रहिवाशांनी केला आहे. 

नालासोपार्‍याला पाऊस पुराने वेढा टाकल्यानंतर गृह कैदेत सापडलेल्या नागरिकांची  पश्चिमेकडील दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा पैसे घेवून लुट चालवली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील एका स्टोअर्सने 20 लिटर पाण्याची बाटली कोणाला 100 तर कोणाला 200 रुपयांना विकली. 

 गेले 3 दिवस वीज नसल्याने नेटवर्क देखील गायब होते. सर्वांचा जगाशी संपर्क तुटला होता गुरुवारी कसेबसे नेटवर्क आले. परंतु अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वीज पुरवठा खंडित केलेला आहे. त्यामुळेही हाल वाढले. वसईतील टोकेपाडा येथील काही लोकांना फादर दिब्रिटो ,व फादर रॉबिन डायस,हेलन कार्व्हालो यांनी गिरिज चर्च येथे आसरा दिला आहे. जीवदानी मंदिर ट्रस्ट ने अनेक भागात जेवणाची व्यवस्था केली होती मात्र अनेक लोकांचा संपर्क न झाल्याने ते वंचित राहिले. टोकेपाडा येथे राहिलेल्या कुटुंबांसाठी भाजपचे प्रमोद भोईर व समसंग यांनी चार दिवसा पासून चहा ,नाष्टा ,जेवणाची सोय केली आहे.

या पावसाने महापालिकेची नालेसफाई ही हातसफाई असल्याचे दाखवून दिले असले तरी महानगरपालिकेने मात्र अशा आरोपांचे खंडन केले आहे. वैद्यकीय आरोग्य विभाग 24 तास कार्यरत असून, महानगर पालिकेच्या डी एम पेटिट रुग्णालय,विजयनगर तुळींज  रुग्णालय,सातीवली माता बाल संगोपन केंद्र आदी ठिकाणी  व इतर 21 नागरी आरोग्य केंद्रामध्ये  व 9 दवाखान्यांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी पूर ग्रस्त भागांत  प्रत्यक्ष भेट देत असून आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहेत. पूर ग्रस्त भागातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांना नागरी आरोग्य केन्द्रमधुन लेप्टो प्रतिबंधात्मक औषध देण्यात येत आहे.

घरोघरी भेट देऊन ताप रुग्ण, साथरोग सदृश रुग्ण ओळखून उपचार दिले जात आहेत. पूराच्या पाण्याची दृष्टी झालेल्या ठिकाणी पाणी शुद्धिकारिता टीसीएल पाउडरचे वाटपही केले जात आहे.