Mon, Mar 25, 2019 13:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसईचा माल्कम डायस बनला फ्लाईंग ऑफिसर

वसईचा माल्कम डायस बनला फ्लाईंग ऑफिसर

Published On: Dec 19 2017 2:02AM | Last Updated: Dec 19 2017 1:42AM

बुकमार्क करा

विरार : वार्ताहर

लष्कर आणि भारतीय वायुसेनेचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वसई तालुक्यातील भुईगाव येथील माल्कम एलिस डायस याची वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. यामुळे भुईगावासह तालुक्यातून आनंद व्यक्त होत असून माल्कम व त्याच्या आई-वडिलांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चार वर्षांपूर्वी माल्कम डायस याची संरक्षण क्षेत्रात मानाच्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या एन. डी. ए (नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी) मध्ये निवड झाली. ही निवड होणारा माल्कम हा तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी ठरला होता. त्यानंतर तो पुण्यातील खडकी येथील नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये लष्कराचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला. सलग तीन वर्षे तेथील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची गेल्यावर्षी हैद्राबाद येथील भारतीय वायुसेनेच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. 

तेथील एक वर्षाचे खडतर प्रशिक्षणही त्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेत मानाच्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या फ्लाईंग ऑफिसरपदी माल्कमची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून माल्कमने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. त्याच्या या यशाने भुईगावसह वसई तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.