Wed, Apr 24, 2019 22:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खळ्ळखट्याक..! मनसेने गुजराती पाट्या हटवल्या

खळ्ळखट्याक..! मनसेने गुजराती पाट्या हटवल्या

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 1:20AMनालासोपारा : रुतिका वेंगुर्लेकर 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजराती फलक लावलेल्या ढाब्यावर रविवारी रात्री खरपूस समाचार घेत 3 हॉटेलच्या फलकांची तोडफोड केली. हे गुजरात नाही महाराष्ट्र आहे, याद राखा मराठीचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा  कुंदन संखे यांनी दिला आहे. फलकांची तोडफोड केल्याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर मनसे कार्यकर्ते मराठीच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मुंबई -अहमदाबाद महामार्गावर वसईत अनेक अस्थापनांना गुजराती पाट्या लावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मनसेने हॉटेल चालक, पोलीस प्रशासन तसेच पालिकेला अनेकदा पत्र देवूनही या पत्राला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या. काल रात्री राज ठाकरे यांच्या सभेहून घरी परतत असताना माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल करत हॉटेलांचे फलक फाडले. ‘महाराष्ट्रात मराठी पाट्या लावल्या पाहिजेत, ही केवळ सुरुवात आहे. महाराष्ट्र शासनाचा गुमास्ता परवाना देताना मराठी बोर्ड असावा अशी अट असते. तसा शासनाचा आदेश असताना त्या आदेशाची पायमल्ली करणार्‍या मुजोर हॉटेल चालकांवर कारवाई करा, मग आमच्यावर खुशाल कारवाई करा’, असे संखे यांनी सांगितले.

मालजीपाड़ा नाका, मुंबई -अहमदाबाद हायवे रोड येथील हॉलिडे धाबा नावाच्या हॉटेलचा बोर्ड लाकडी बांबूने तोडला. तसेच सुसुनवघर येथील हॉटेल न्यु काटीयावाड, हॉटेल रुची काटीयावाड , हॉटेल गुरुकृपा या तीन हॉटेलांची तोडफोड केली म्हणून वालीव पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कायदाअंतर्गत मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags : Vandalav Police Station, filed, complaint, MNS activist, for breaking the board,