Tue, Nov 20, 2018 23:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाजपेयींचे मुंबईत भव्य स्मारक उभारणार

वाजपेयींचे मुंबईत भव्य स्मारक उभारणार

Published On: Aug 23 2018 1:38AM | Last Updated: Aug 23 2018 1:33AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारच्या वतीने मुंबईत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबई येथील श्रद्धांजली सभेत केली. मुंबई भाजपच्या वतीने ही सभा एनसीपीए येथे आयोजित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी अर्थतज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञही नव्हते. पण समाजाला काय पाहिजे, याची त्यांना चांगली जाण होती. मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सामाजिक आरक्षणाची कालमर्यादा संपली असतानाही ती वाढविण्याचे काम करून वाजपेयी यांनी सामाजिक न्यायाची भूमिका निभावली.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी अटलबिहारी वाजपेयीच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रासाठी वाजपेयींनी दिलेल्या योगदानांच्या आठवणी सांगितल्या. संत ज्ञानेश्‍वरांच्या समाधीला 700 वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ज्ञानेश्‍वरांचे टपाल तिकीट मान्यतेला वाजपेयींनी तत्काळ मान्यता दिली होती. याची आठवण सांगितली. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीयमंत्री पीयुष गोयल यांच्यासह भाजपचे खासदार, आमदार नगरसेवक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.