होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडापावमध्ये चक्‍क मेलेली पाल !

वडापावमध्ये चक्‍क मेलेली पाल !

Published On: Aug 24 2018 1:22AM | Last Updated: Aug 24 2018 1:03AMअंबरनाथ ः प्रतिनिधी

रस्त्यावरील खाद्य पदार्थांमध्ये झुरळ, घरमाशी, किडे आढळून येणे हे आता नवीन राहिले नाही. मात्र अंबरनाथमध्ये चक्‍क वडापावमध्ये मेलेली पाल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडे हा वडापाव तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंबरनाथ पूर्व भागातील स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांच्या गाड्या लागतात. या खाद्यपदार्थांमध्ये सर्वात जास्त विकला जातो तो वडापाव. येथील प्रसिद्ध असलेल्या बबन वडापाव या स्टॉलमध्ये अल्पा गोहिल या ग्राहकाने गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वडापाव विकत घेतला. हा वडापाव खाताना त्यामध्ये चक्‍क मृत पाल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार स्टॉलमालकाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र त्याने या ग्राहकाचे काहीही ऐकून न घेता त्यांना अक्षरशः हाकलून लावले. यानंतर गोहिल यांनी हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्यानंतर चांगलीच खळबळ माजली. 

खडबडून जागे झालेल्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने बबन वडापाव येथे धाव घेतली. मात्र, स्टॉलचालकाचा अन्न व औषध प्रशासनाचा परवानाही रद्द झाल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकारानंतर मनसे पदाधिकार्‍यांनीही या दुकानात धाव घेऊन एकच गोंधळ घातला. अखेर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आली.