Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंच्या 'कृष्‍णकुंज'बाहेरच आता फेरीवाले!

राज ठाकरेंच्या 'कृष्‍णकुंज'बाहेरच फेरीवाले!

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 9:01AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

नगरसेवकांना विश्‍वासात न घेताच मुंबई महापालिकेने परस्पर फेरीवाला क्षेत्र जाहीर करत त्यावर हरकती व सूचना मागवल्याने मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा फेरीवाल्यांभोवती फेर धरू लागले आहे. घोषित फेरीवाला क्षेत्राच्या तडाख्यात अनेक सेलिब्रिटी आणि व्हीआयपींची घरे सापडल्याने तर हे राजकारण आता आक्रमक वळणावर जाण्याची चिन्हे आहेत. 

फेरीवाला आमच्या दारी नको.. असे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या वक्तव्य करून सर्वच राजकीय पक्षांनी नवा वाद उकरून काढला असून, पालिकेने घोषित केलेल्या फेरीवाला क्षेत्राला आक्षेप घेत, मंगळवारी मनसेने आवाज उठवला. तर बुधवारी स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांनी फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यापूर्वी प्रशासनाने पालिकेचे ट्रस्टी या नात्याने नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे होते. पालिकेने चुकीच्या पध्दतीने फेरीवाला क्षेत्र घोषित केले असून हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी लावून धरण्यात आली. 

मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी पालिका प्रशासनाने पालिकेच्या वेबसाईटवर मुंबई व उपनगरांत फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र घोषित केले.

एवढेच नाही तर, जनतेच्या हरकती व सूचनाही मागवल्या. पालिकेने घोषित केलेल्या फेरीवाला क्षेत्राला आक्षेप घेत, मनसेने जोरदार विरोध केला आहे. फेरीवाला क्षेत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज घरासमोरील रस्त्यासह मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेरील पद्माबाई ठक्कर मार्ग फेरीवाला क्षेत्र घोषित केले आहे. फेरीवाला क्षेत्रावरून बुधवारी स्थायी समितीने प्रशासनाला धारेवर धरले. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून, महापौर, महापालिका सभागृह,  स्थायी समितीला डावलून फेरीवाला क्षेत्राबाबत बनवलेल्या रस्त्यांच्या यादीबाबत हरकती व सूचना मागवल्याचा आरोप केला. हरकती व सूचनांची प्रक्रिया सुरू पण आम्हाला माहीत नाही. 85 हजार परवाना देण्यात येणार असल्याचे समजते, पण अजून हायकोर्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही यादी त्वरित थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

नगरेसवक व लोकांचे संबंध संपलेत, नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही, घाटकोपरमध्ये 18 पैकी 11 रस्ते फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. अद्यापपर्यंत शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली नाही. जे रस्ते पूर्वी फेरीवाला मुक्त करण्यात आले होते. तेच रस्ते आता फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहेत. आयुक्तांनी सभागृहात निर्णय घ्यावा, बाहेर परस्पर निर्णय घेऊ नये असा सल्लाही राजा यांनी दिला. प्रशासन मनमानी करतेय, प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून आहे. अधिकारी त्यांच्या सोयीनुसार काम करत आहेत. जेथे पदपथच नाहीत तेथे फेरीवाला क्षेत्र कसे काय घोषित करू शकतात, असा सवाल सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला. प्रशासनने जाणून बुजून परस्पर निर्णय घेत आहे. त्यामुळे स्थायी समिती कोणतेही कामकाज न करता तहकूब करण्यात यावी, अशी सूचना जाधव यांनी मांडताच प्रशाससनाचा निषेध करत समिती तहकूब करण्यात आली. यावर प्रशासनाने एकही शब्द न उच्चारता गप्प बसणे पसंत केले.