Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साम, दाम, दंड, भेद वापरा; मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला : उद्धव यांचा दावा

साम, दाम, दंड, भेद वापरा; मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरेंकडून व्हायरल

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 26 2018 1:51AMपालघर : वृत्तसंस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमधील आपल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला आहे. दरम्यान, ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी केला आहे, तर यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

पालघरमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जाहीर केली. हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल, तर एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की, भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आले पाहिजे. ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचा दावा त्यांनी केला.

ही निवडणूक जर जिंकायची असेल, तर जशास तसे उत्तर दिले पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला, तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. तुमच्या पाठीशी ताकदीने आणि खंबीरपणे मी उभा आहे. ‘अरे ला कारे’मध्येच उत्तर द्यायचे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून इन्कार

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी केला आहे. भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अर्धवट आणि एडिट केलेली ऑडिओ क्लिप दाखवली जात आहे. यासंदर्भात उद्या निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहेच; पण त्याबरोबर खरी क्लिपही उद्या जाहीर करणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.