Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंद उद्योगांच्या जमिनी विकासकांना मोकळ्या

बंद उद्योगांच्या जमिनी विकासकांना मोकळ्या

Published On: Aug 27 2018 1:38AM | Last Updated: Aug 27 2018 1:32AMमुंबई : संदेश सावंत 

मुंबई महानगर परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील  बंद उद्योगांच्या भूखंडांचा आता निवासी कारणांसाठी वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तशी अधिसूचना नगर विकास विभागाने जारी केली आहे. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर या महानगर पालिकांच्या हद्दीतील बंद उद्योगांच्या जमिनी विकासकांना मोकळ्या होणार आहेत.
नगर परिषद, नगरपंचायतींच्या क्षेत्रातही रेडीरेकनरच्या 20 टक्के दर (अधिमूल्य) आकारून औद्योगिक जागेत निवासी वापर करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाद्वारे शहरांच्या विकास आराखड्यात औद्योगिक, निवासी व अन्य कारणांसाठी जमिनींचा वापर वेळोवेळी निश्‍चित करण्यात येतो. जनहिताच्या दृष्टीने नवी मुंबई, कोकण विभाग आणि राज्यातील सर्व अ, ब, क वर्ग नगर परिषदा, नगर परिषदांच्या परिसरात असणार्‍या औद्योगिक क्षेत्रांमधील बंद असलेल्या कारखान्यांच्या जागेचा निवासी वापर करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

असा करता येणार जागेचा वापर

 बंद उद्योगांच्या जमिनींचा वापर निवासी कारणांसाठी करताना एकूण चटई क्षेत्राच्या 20 टक्के जागा वाणिज्य, तर 20 टक्के जागा निवासी बांधकामासाठी उपलब्ध होईल. 10 टक्के जागेचा वापर  हा इलेक्ट्रिक सबस्टेशन, बस स्टॉप, पोस्ट ऑफिस, पोलीस चौकी आदी सुविधांसाठी करावा लागणार आहे.

बाजारमूल्याच्या 20 टक्के अधिमूल्य 

औद्योगिक क्षेत्राचा वापर निवासी कारणासाठी करण्यास परवानगी देताना जमिनीच्या बाजारमूल्याच्या 20 टक्के रक्कम अधिमूल्य आकारण्यात येणार आहे. ज्या वर्षी जमीन वापराच्या कारणात बदल करण्यात येईल, त्यावर्षीच्या बाजारमूल्यानुसार अधिमूल्य आकारण्यात येईल.