Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मासे खाताय! पण जरा जपून

मासे खाताय! पण जरा जपून

Published On: Jul 22 2018 1:24AM | Last Updated: Jul 22 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांच्या ताटात येणारे म्हावरे चांगल्या दर्जाचे आहे का ? राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने याची चौकशी सुरू केली आहे. यासाठी राज्याच्या अन्न व औषध विभागाने मुंबईतील विविध मासळी बाजारातून तपासणीसाठी माशांचे नमुने जप्त केलेत. गेल्या काही दिवसांपासून मासळी जास्त दिवस टीकवण्यासाठी फॉर्मलिन नावाच्या केमिकलचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आल्याने एफडीएने ही कारवाईकेली.

मागील काही दिवसांपासून अन्य राज्यात मासे दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी त्यात केमिकल औषधांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले. मुंबईतील काही मासळी बाजारात बाहेरच्या राज्यातून मासे विक्रीसाठी येतात. त्यामुळे आम्ही मुंबईत मिळणार्‍या माशांचे नमुने चौकशीसाठी जप्त केले अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी दिली.

शैलेश आढाव पुढे म्हणतात, कफपरेड, क्रॉफर्ड मार्केट अशा मोठ्या मासळी बाजारात मुंबईबाहेरुन येणार्‍या पाच विविध माशांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. एफडीएच्या प्रयोगशाळेत यावर तपासणी करून लवकरच अहवाल सादर केला जाईल. मुंबईत मिळणारे मासे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पकडण्यात येतात. एफडीए अधिकार्‍यांच्या माहितीप्रमाणे, येणार्‍या काळात मुंबईतील इतर ठिकाणांवरूनही माशांचे नमुने जप्त करण्यात येतील.

सध्या समुद्रातील आणि खोल पाण्यातील मासेमारी बंद असल्याने ताजे मासे मिळणे बंद झाले आहे. मासे दीर्घकाळ टिकावे यासाठी  फॉर्मलिन नावाचे रसायन वापरण्यात येत आहे. फॉर्मलिनचा वापर शवागरातील मृतदेह अधिककाळ चांगला राहावा यासाठी वापरला जात आहे. खासकरुन गोड्या पाण्यातील माशांना जास्त काळ टिकवण्यासाठी याचा वापर करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. फॉर्मलिन जास्त प्रमाणात शरीरात गेले तर पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय दीर्घकाळ फॉर्मलिनयुक्त मासे खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. 

फॉर्मलिनच्या भीतीमुळे काही दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात बाहेरील राज्यातून येणार्‍या माशांवर बंदी घातली होती. ही बंदी जुलै महिनाअखेरपर्यंत असणार आहे. केरळच्या अन्न सुरक्षा विभागाने शुक्रवारी 6 हजार किलो फॉर्मलिन केमिकल असलेले मासे जप्त केलेत.

सद्य स्थितीला महाराष्ट्रात फॉर्मलिन असलेली मासळी आढळून आलेली नाही. राज्यात पावसाळ्यात दोन महिने मच्छिमारी बंद आहे. त्यामुळे राज्यातील मासळी लोकांना खाण्यासाठी योग्य आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे मच्छीमार संघटनेचे दामोदर तांडेल यांचे म्हणणे आहे.