Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्मार्टफोनचा अतिवापर मेंदूला घातक

स्मार्टफोनचा अतिवापर मेंदूला घातक

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 11:58PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मोबाईल्स हे माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेले असतानाच त्याबाबत  विविध प्रकारचे संशोधनही होत असून त्याचे निष्कर्षही निघत आहेत. आता करण्यात आलेल्या नवीन संशोधनानुसार स्मार्टफोन्स व इंटरनेटच्या अतिवापरामुळे मेंदूमध्ये असंतुलन निर्माण होणे, तसेच त्यामुळे थकवा, कमालीची चिंता यासारखे प्रकार वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

या पाहणीमध्ये स्मार्टफोन तसेच इंटरनेटशी सातत्याने जोडून घेतलेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील निष्कर्षानुसार स्मार्टफोन तसेच इंटरनेटशी सातत्याने ‘कनेक्ट’ असलेल्या लोकांच्या मेंदूतील रासायनिक प्रक्रियेमध्ये असंतुलन आढळून आले. परिणामी त्यांच्या मेंदूद्वारे होणार्‍या कार्याचे नुकसान होत असल्याचे आढळून आले. तसेच या लोकांमध्ये थकणे, टोकाची चिंताही आढळून आली.

आता करण्यात आलेल्या संशोधनामध्ये स्मार्टफोन व इंटरनेटच्या आहारी गेलेल्या 19 युवकांचा अभ्यास करण्यात आला. त्यांची तुलना त्यांच्याच वयोगटाच्या;  परंतु स्मार्टफोन न वापरणार्‍या लिंगसाधर्म्य असलेल्या तरुण,तरुणींशी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित युवकांच्या व्यसनाची तीव्रता तपासण्यात आली. त्यासाठी प्रश्‍नावली तयार करून तिचा आधार घेण्यात आला. त्यांचे हे व्यसन त्यांच्या सर्जनशीलतेवर, झोपेवर कसे परिणाम करते याचा अभ्यास करण्यात आला व त्यानुसार त्यांना गुण देण्यात आले. या गुणांनुसार त्यांच्या व्यसनाची तीव्रता तपासण्यात आली. या चाचणीद्वारा क्रीएटाईन व ग्लुटामेट या महत्त्वाच्या अ‍ॅसिडशी गॅबा रसायनाच्या परस्परसंबंध प्रमाणतेचा अभ्यास करण्यात आला व त्याद्वारे संबंधित लोक इंटरनेट तसेच स्मार्टफोनचे कसे ‘अ‍ॅडिक्ट’ झाले, तसेच चिंता व नैराश्याचे कसे बळी ठरत आहेत, याचे निष्कर्ष काढण्यात आले. त्यामध्ये मेंदूच्या असंतुलनासारख्या महत्त्वाच्या बाबी आढळून आल्या आहेत.