Thu, Nov 15, 2018 12:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेसाच्या निधीचा प्रभावी वापर करा

पेसाच्या निधीचा प्रभावी वापर करा

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

पेसा कायद्यांतर्गत पाच टक्के अबंध निधी थेट आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना देण्यात येतो. या निधीचा उपयोग आदिवासी गावांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात यावा, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आदिवासी विकास व ग्रामविकास विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. 

राजभवन येथे शनिवारी झालेल्या बैठकीत पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा राज्यपालांनी आढावा घेतला. आदीवासी विकास मंत्री विष्णु सवरा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता आदी उपस्थित होते. पेसा फंड मॅनेजमेंट अप्लीकेशन हे अ‍ॅप विकसीत करण्यात आहे. यामुळे पेसा निधीतून ग्रामपंचायत करत असलेल्या कामाचे संनियंत्रण करण्यात येणार आहे. निधीची तरतूद, निधीचा विनीयोग व उपयोगिता यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आल्याची माहिती विभागाच्या मनिषा वर्मा यांनी दिली. ग्रामविकास विभागात पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 22 जानेवारीपासून पेसा सेल सुरू करण्यात आल्याची माहिती असीम गुप्ता यांनी दिली.

पेसा कायद्यांतर्गंत ग्रामपंचायतीना पाच टक्के थेट निधी देण्यात येतो. त्यामधून पायाभुत सुविधा, वन व जल संवर्धन, आरोग्य, स्वच्छता व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच अनुसूचीत क्षेत्रातील शिक्षकांची पद भरतीही करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.  जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर व ग्रामस्तरांवर कार्यरत पेसा समन्वयकांची प्रशिक्षणाद्वारे क्षमता बांधणी करण्यात यावी, असेही निर्देश राज्यपालांनी दिले.