Wed, Aug 21, 2019 20:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपच्या अपेक्षेला शिवसेनेच्या वाटाण्याच्या अक्षता!

भाजपच्या अपेक्षेला सेनेच्या वाटाण्याच्या अक्षता!

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 10:17AMनवी मुंबई : प्रतिनिधी

आगामी निवडणुका स्वबळावरच लढण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या शुक्रवारच्या महामेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत असावी अशी इच्छा असल्याचे सांगून, शिवसेनेबरोबर युतीचे संकेत दिले होते. त्यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करीत भाजपच्या अपेक्षेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

नवी मुंबईत नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये शिवसेनेचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना, सहा महिन्यांपूर्वी भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर येण्याचा दावा करणार्‍या भाजपची भाषा सहा महिन्यांतच बदलल्याचे सांगून देसाई म्हणाले की, भाजपची बदललेली भाषा पाहता त्यांचा आत्मविश्‍वास डळमळीत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच सहा महिन्यांच्या आतच भाजपची सत्ता येणार, ही भूमिका सोडून एनडीएची भाषा भाजपच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे.     

फक्‍त भाजप अशी भाषा बोलणार्‍यांना आता मित्रांची आठवण झाली आहे. शिवसेनेने यापूर्वीच आपण स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालेला नसल्याचे सांगून देसाई म्हणाले की, राज्यातील सर्व नेत्यांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच एकमेव लोकप्रिय नेते आहेत. शिवसेना स्वबळावर लढेल व 2019 साली राज्यात सत्ता स्थापन करेल. 2019 साली मंत्रालयावर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे.

आंदोलनाची ताकद शिवसेनेतच

शिवसेनेच्या माध्यमातून आपण जी कामे केली आहेत, ती जनतेपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. गावठाणातील घरी आणि झोपडपट्ट्या अधिकृत करण्यासाठी जे निर्णय घेतले आहेत, त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. ही आंदोलने करण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे, असेही सुभाष देसाई यावेळी म्हणाले. या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, हरिभाऊ म्हात्रे, जिल्हा संघटक संध्या वडावकर, रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक नामदेव भगत, उपशहरप्रमुख गणपत शेलार, नगरसेवक काशिनाथ पवार आदी उपस्थित होते.

फेरीवाले ही शहरांची गरज आहे. त्यांना  व्यवसाय करून आपली उपजीविका करण्याचा हक्क आहे. हे लक्ष्यात घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने फेरीवाला धोरण तयार केले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेने लढा उभारण्याची आवश्यकता आहे, असे सुभाष देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणूक आली की समाजसेवेची दुकाने थाटायचे हे काम आमचे नाही. शिवसेनेच्या शाखा जनतेला मदत करण्यासाठी रात्रंदिवस सुरु असतात. जिथे अन्याय होतो तिथे शिवसेना सर्वात आधी धावून जाते. शिवसेना कधीच फायदा पाहून काम करीत नाही, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले.

नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे आणि पुनर्विकासाचे अनेक प्रश्न लोंबकळत आहेत. अडीच एफएसआयचा जीआर होऊन तीन वर्षे लोटली तरी आजून एक वीटही रचली गेलेली नाही. जीआर काढायचे आणि जनतेला भुलवायचे हीच यापूर्वी आणि आताही सुरु आहे, असा घणाघात शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी यावेळी केला.

Tags : mumbai, mumbai news, Upcoming election issue, Industry Minister Subhash Desai,