Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनाप्रमुखांचे शिलेदारच संतापले; सेनेत अस्वस्थता

सेनाप्रमुखांचे शिलेदारच संतापले; सेनेत अस्वस्थता

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:54AMमुंबई : राजेश सावंत

निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेनेतील शिवसेनाप्रमुखांच्या शिलेदारांनी एकत्र येत सेनेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केल्याने खासकरून मुंबईतील शिवसेनेत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. आम्ही शिवसेनेच्या पायाचे दगड आहोत. आमच्यात आजही तलवार उचलण्याची ताकद आहे. आम्हाला पदे नकोत. आम्ही निवृत्तीवेतन मागत नाही, सन्मान मिळावा हीच इच्छा आहे; पण उद्धवजींना खरंच आमची गरज आहे का, असा थेट सवाल करत शनिवारी ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढीसाठी आंदोलन करणार्‍या ज्येष्ठ शिवसैनिकांचे शनिवारी दादर येथील देवराज सभागृहात संमेलन संपन्न झाले. या संमेलनाला शिवसेना नेते मनोहर जोशी, लीलाधर डाके, सतीश प्रधान, माजी महापौर महादेव देवळे, दिलीप नाबर बाळासाहेबांचे अंगरक्षक यांच्यासह 70 ते 75 च्या वयोगटातील सुमारे 250 शिवसैनिक उपस्थित होते. 

मनोहर जोशी यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ शिवसैनिकांचा ग्रुप का तयार झाला, असा थेट सवाल केला. तुमच्या मनात काही शंका असतील तर विचारा, असे सांगून ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही काहीच बोलले नाही. पण जोशी निघून जाताच शिवसैनिकांनी आपल्या मनातील खदखद अन्य नेत्यांसमोर बोलून दाखवली. आपली नाराजी त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली. शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या. जेलमध्ये गेलो. कधीही पळ काढला नाही. बाळासाहेबांनी पाजलेले  बाळकडू आजही रक्तात आहे. आम्ही आमदार, खासदार, नगरसेवक एवढेच काय पक्षाचे कुठले पदही मागत नाही; पण पक्षाला आमची खरच गरज आहे का, असा परखड सवाल उपस्थित केला.

साहेब नेहमी म्हणायचे, शिवसेनेत दोन पदे आहेत. एक शिवसेनाप्रमुख व दुसरे शिवसैनिक. त्यामुळे आम्हाला मानाने वागवा, असा जणूकाही इशाराच सेनाप्रमुखांच्या या शिलेदारांनी दिला. तुम्ही प्रवाहातील शिवसैनिक आहात प्रसादाचे नाही. घराच्या बाहेर जेवढ्या जास्त चप्पल दिसतील ती तुमची श्रीमंती ! साहेबांची ही शिकवण आजही लक्षात आहे. त्यामुळे पदासाठी कधीही लाचार झालो नाही. पण आपलीच लोकं आपल्या विरोधात बंड उभारतात, परक्यासारखी वागणूक देतात, तेव्हा दु:ख होते, अशी खंत शिवसैनिकांनी व्यक्त केली. 

व्यासपीठावरील शिवसेना नेत्यांनी उपस्थित शिवसैनिकांना बराच वेळ समजवण्याचा प्रयत्न केला. ‘साहेब म्हणाले होते, शिवसेना वाढली तर, त्याचा फायदा दुसर्‍या पिढीला होईल. तुम्ही ज्येष्ठ आहात. त्यामुळे मान राखला गेलाच पाहिजे.’ पण नेत्यांच्या समजवण्याचा काहीच फायदा झाला नाही. या इर्षेने शिवसैनिक पेटले होते. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींना आमची खरंच गरज आहे का, असा सवाल करत शिवसैनिकांनी नेत्यांना बुचकळ्यात टाकले. 

तब्बल दीड तास सुरू असलेल्या गप्पांमुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते. त्यामुळे या जुन्या जाणत्या  शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समजूत काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसैनिक नाराजीची प्रमुख पाच कारणे

पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाधिकार्‍यांमार्फत काही तक्रार केल्यास त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. या तक्रारी उद्धव यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही हीदेखील शंका.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सामान्य शिवसैनिकांना मातोश्रीचे दरवाजे बंद झाले आहेत.

विभागातील शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमापासून ज्येष्ठ शिवसैनिकांना दूर ठेवले जाते.

विभागप्रमुखांसह उपविभाग प्रमुख व शाखाप्रमुख या प्रमुख पदांची निवड करताना ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून मत जाणून घेतले जात नाही.

आमदार व नगरसेवक यांच्याकडून ज्येष्ठ शिवसैनिकांना दुय्यम वागणूक दिली जाते.

जोशींचा काढता पाय
 

शिवसेनेतील सर्वात हजरजबाबी नेता म्हणून मनोहर जोशींकडे पाहिले जाते. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या संमेलनात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे लक्षात येताच आपल्या गावच्या घराचा आराखडा तयार करून देणार्‍या आर्किटेकचा 75 वा वाढदिवस असल्यामुळे आपल्याला जाणे भाग असल्याचे कारण सांगत, कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेले. त्यामुळे शिवसैनिकांच्या तावडीत शिवसेना नेते लीलाधर डाके व सतीश प्रधान सापडले.