Mon, Sep 24, 2018 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठ आता अ‍ॅपवर

मुंबई विद्यापीठ आता अ‍ॅपवर

Published On: Aug 25 2018 1:33AM | Last Updated: Aug 25 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या टप्यात 6 लाख विद्यार्थी व 791 महाविद्यालयांस जलद संवादाचे माध्यम म्हणून विद्यापीठाच्या मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. सदर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थांस प्रवेशापासूनपरीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

विद्यापीठाने आयोजित केलेल्या फोर्ट मधील दीक्षांत सभागृहात प्राचार्यांच्या बैठकीत मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनी प्राचार्यांसमोर शैक्षणिक वर्षे 2018-19 मध्ये होणार्‍या अनेक शैक्षणिक घडामोडींची माहिती दिली. तसेच यावेळी प्राचार्यांनीही विद्यापीठाकडून विविध अपेक्षा व्यक्त केल्या. 

पेडणेकर म्हणाले, सध्या संशोधन व नवोपक्रमामध्ये स्थानिक व जागतिक गरज पाहणे महत्वाचे आहे. यामध्ये आंतरशाखीय  दृष्टिकोन, उद्योग व शैक्षणिक सहकार्य व आंतरराष्ट्रीय सहकार्य या माध्यमातून   संशोधन व विकास करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठामधील  विद्यानगरी कॅम्पसमध्ये लवकरच इनक्युबेशन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने देखील  संशोधनासाठी  इनक्युबेशन केंद्र स्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी विद्यापीठाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने बनविलेल्या 3 हजार 600 व्हर्च्युअल  टूर या फोर्ट व विद्यानगरी विभागातील विद्यापीठाच्या विविध इमारतीच्या विविध अँगलने  काढलेल्या विविध छायाचित्रांचेही उद्घाटन आज करण्यात आले आहे. सदर व्हर्चुअल टूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या बैठकीला  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे उपस्थित होते. तसेच डॉ. उदय साळुंखे, सुचित्रा सुर्वे, स्वाती साळुंखे यांनी याप्रसंगी प्राचार्यांना मार्गदर्शन केले.