Mon, Aug 26, 2019 01:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थी समुपदेशन केंद्रे सुरू करा 

विद्यार्थी समुपदेशन केंद्रे सुरू करा 

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 12:59AMमुंबई : प्रतिनिधी 

भारतात दरवर्षी जवळपास 1,35,000 लोक  आत्महत्या करतात. 2014 मध्ये परीक्षेच्या कारणांमुळे जवळपास 2400 मुलांनी तर 7000 पेक्षा जास्त व्यक्तींनी मानसिक तणावामुळे आत्महत्या केली. या पार्श्‍वभूमिवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीही शालेय अभ्यासक्रमात मानसिक आरोग्याचा धडा सुरू करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती दिली होती. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालय आणि विद्यापीठात विद्यार्थी समुपदेशन केंद्रे उभारण्याबाबत आदेश दिले आहेत.

परीक्षा काळात विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली असतात. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारही अभ्यासक्रमात मानसिक आरोग्याचे धडे देण्याबाबत विचार करत आहे. आता युजीसी म्हणजे युनिवर्सिटी ग्रॅन्ट कमिशनने पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती समजून घेणे गरजेचे असल्याने युजीसीने विद्यापीठ आणि इन्स्टिट्युमध्ये स्टुटंड काऊसिलिंग सेंटर तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

युजीसीने देशभरातील सर्व कॉलेज, विद्यापीठ आणि इन्स्टिट्युटला नुकतेच पत्र लिहीले आहे. विद्यार्थी समुपदेशन ही एक वेगळी पद्धत असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या जसे की, चिडचिडेपणा, ताण-तणाव, मनातील भिती यांच्यावर चर्चा केली जाईल.

यासंदर्भात बोलताना मुंबईचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणाले की, विद्यापीठ आणि इन्स्टिट्युटमध्ये समुपदेशन केंद्र असणे खूप फायदेशीर ठरेल. मुलांमध्ये असणार्‍या मानसिक समस्या वेळीच लक्षात येतील आणि त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील. आणि सध्याच्या तरूणाईला याचा भरपूर फायदा होईल.

तर मानसोपचारतज्ज्ञ हिना मर्चंट म्हणाल्या की, ही एक चांगली गोष्ट आहे. युनिवर्सिटी ग्रॅन्ट कमिशनने एक चांगले पाऊल उचलले आहे. सध्या मुलांवरील ताण वाढतोय. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी देखील हे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असे केंद्र असणे मुलांसाठी खूप फायदेशीर ठरेल.

Tags : University, Grants, Commission, Order, mumbai news