Thu, Apr 25, 2019 13:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणासाठी आंदोलक महिलांचे आझाद मैदानावर अनोखे रक्षाबंधन

मराठा आरक्षणासाठी आंदोलक महिलांचे आझाद मैदानावर अनोखे रक्षाबंधन

Published On: Aug 27 2018 1:38AM | Last Updated: Aug 27 2018 1:18AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मुख्यमंत्री कामाच्या व्यापामुळे येऊ शकले नाहीत हे बहिणीच्या नात्याने आम्ही समजून घेतो. पण आरक्षणाच्या लढाईत बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना सरकारने त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी पुष्पा तोडकर यांनी केली.

रविवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलक महिलांनी उपस्थित बांधवांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला ताकद द्या, असे भावुक आवाहनही त्यांनी केले. 

कोपरखैरणे येथे आंदोलनात मृत्युमुखी झालेल्या रोहन तोडकर याच्या कुटुंबातील सदस्य रविवारी आंदोलन स्थळी आले होते.पुष्पा तोडकर या पाटण तालुक्यातील खोणोली येथून सहकुटुंब आल्या होत्या. 

यावेळी  बोलताना पुष्पा तोडकर यांनी रोहनच्या कुटुंंबाची व्यथा आंदोलकांसमोर मांडत  सरकारकडे  मदतीची मागणी केली.  माणुसकीच्या नात्याने सरकारने रोहनच्या कुटुंबाचा विचार  करावा. या कुटुंबात रोहन हाच घरचा कर्ता पुरूष होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे कुटूंब उघड्यावर पडले आहे, कुटुंंबाची वाताहत सुरू आहे. मदतीसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे. परंतु अद्याप कोणतीच मदत सरकारकडून देण्यात आली नाही. त्यामुळे सरकारने मदत देण्याबाबत तत्परता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.

कडेगाव येथील ज्योती शिंदे यांनी, मराठा आरक्षणासाठी  प्रसंगी बलिदान देण्यास तयार असल्याचे सांगितले. सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणेे आंदोलकांवरील गुन्हे सरसकट  मागे घ्यावेत, अशी मागणी परत एकदा केली.

सलग चार दिवस आंदोलनास बसलेल्या पुणे येथील रुपाली पाटील यांनी  मराठा आंदोलकांवर खोट्या कारणांखाली केसेस दाखल होत असल्याचे सांगून आंदोलकांची धरपकड थांबवण्यात यावी, अशी मागणी केली.