Tue, Sep 25, 2018 02:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचे धोरण लवकरच

पेट्रोलमध्ये मिथेनॉल मिसळण्याचे धोरण लवकरच

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 1:04AM

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळण्यासंदर्भात संसदेच्या आगामी अधिवेशनात धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली. मिथेनॉलची निर्मिती कोळशापासून केली जाते. पेट्रोलच्या 80 रुपये प्रतिलिटर किमतीच्या तुलनेत त्याची किंमत प्रतिलिटर 22 रुपये आहे. चीनसुद्धा कोळशापासून 17 रुपये प्रतिलिटरप्रमाणे पेट्रोल बनवणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. कोळशापासून पेट्रोलची निर्मिती केल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असे ते म्हणाले.

दीपक फर्टिलायझर्स आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्ससह (आरसीएफ) मुंबई परिसरातील कारखान्यांमध्ये मिथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते, असे गडकरी म्हणाले. व्होल्वो या स्वीडिश ऑटो कंपनीला मिथेनॉलवर चालणारे एक विशेष इंजिन मिळाले आहे. त्यामध्ये स्थानिक स्तरावर मिळणार्‍या मिथेनॉलचा वापर केला जातो. या इंधनावर 25 बस चालविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

आपण यासंदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रभारींना प्रस्ताव दिला आहे. 70 हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पादन खर्च असणार्‍या पेट्रोल रिफायनरीच्या निर्मितीऐवजी याकडे लक्ष द्यावे, असा हा प्रस्ताव असल्याचे गडकरी म्हणाले.