Fri, Jul 19, 2019 13:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेलः ना. अल्फोन्स

शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेलः ना. अल्फोन्स

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:25AMरायगड : प्रतिनिधी

देशाच्या इतिहासात मराठा साम्राज्याचे योगदान महत्त्वपूर्ण असून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे.अल्फोन्स यांनी रायगडावर केले. त्यांनी रायगडला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. सोबत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे होते.

शिवरायांनी इतक्या उंच पर्वतावर  उभारलेली राजधानी पाहून  आपण भारावून गेलो असल्याचे सांगत ना. अल्फोन्स यांनी जगभरातील अनेक ऐतिहासिक स्थळे पाहिली, पण छत्रपतींची राजधानी सर्वोत्तम असल्याचे मत व्यक्‍त केले. गडावर चाललेले उत्खननाचे काम पाहून समाधान व्यक्‍त केले. या उत्खननात मिळालेल्या सर्व वस्तू त्यांनी पाहिल्या. गडाचा लष्करीद‍ृष्ट्या अभ्यास, तसेच गडावर मिळालेल्या सर्व वस्तूंचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास व महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले यांचे चांगल्याप्रकारे सादरीकरण केल्यास जगभरातले अभ्यासक रायगडाकडे आकर्षित होतील, अशी अशा त्यांनी व्यक्‍त केली.

महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्‍त प्रयत्नातून रायगडाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. खा. संभाजीराजे छत्रपती हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी  या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे ही विशेष समाधानाची बाब आहे. रायगड किल्ल्याबरोबरच परिसरातील गड पायथ्याला असलेल्या एकवीस गावांचा विकास करण्याच्या योजनेला सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.  

संभाजीराजे म्हणाले, रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आणि गडकिल्ल्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून मी जगाच्या नकाशावर  शिवछत्रपतींचा इतिहास तसेच रायगड किल्ल्याचा लौकिक पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून रायगड विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य घेऊन एक चांगला उपक्रम राबविणार आहोत. यावेळी भारतीय पुरातत्त्व खात्याचे डॉ. ए. के. सिन्हा, कॅप्टन शिवाजीराव महाडकर, प्रा. रामनाथन, बिपीन नेगी, पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात उपस्थित होते.