Fri, Apr 26, 2019 17:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटीच्या 1 लाख कर्मचार्‍यांना गणवेश

एसटीच्या 1 लाख कर्मचार्‍यांना गणवेश

Published On: Dec 29 2017 11:14AM | Last Updated: Dec 29 2017 11:14AM

बुकमार्क करा
ठाणे : अनुपमा गुंडे

राज्यातील 1 लाख एसटी कर्मचार्‍यांना 2018 मध्ये चार गणवेश देण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे, येत्या 6 जानेवारीला प्रत्येक आगारात आणि कार्यशाळांमध्ये या गणवेशाचे वाटप होणार आहे. 31 मार्च अखेर दोन तर 31 डिसेंबर अखेर 2 असे 4 गणवेश महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मिळणार आहेत. 2015 - 16 आणि 2016 - 17 या वर्षातील हे गणवेश आहेत. या गणवेशात महिला कर्मचार्‍यांना साडी किंवा सलवार - कुर्ता असा गणवेश असणार आहे. या दोन्ही प्रकारात महिलांना पैसे किंवा
सामान ठेवण्यासाठी खिशांची सोय करण्यात आली आहे. कार्यशाळेतील कर्मचार्‍यांचे गणवेश निळ्या रंगांत असतील.

एसटीच्या स्थापनेपासून प्रथमच कर्मचार्‍यांना तयार गणवेश दिला जात आहे. याआधी कर्मचार्‍यांना गणवेशाचे कापड किंवा शिलाई भत्ता दिला जात असे. कर्मचार्‍यांच्या गणवेशात एकसारखेपणा असावा, यासाठी महामंडळाने यासाठी निविदा काढली होती. निविदा प्रक्रियेस उशीर होत गेल्याने महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे गणवेशाचे धुणे लांबणीवर पडत होते.

अखेर महामंडळाने तयार गणवेश पुरविण्याचा ठेका केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेला देण्यात आले. या संस्थेने कर्मचार्‍यांच्या गणवेशाचे डिझाईन तयार केले आहे. या संस्थेच्या देशभर अनेक शाखा असून वाशी येथे एक शाखा आहे.

तयार गणवेशाची काही कर्मचार्‍यांसोबत चाचणीही करण्यात आली आहे. तसेच गणवेशासाठी वापरण्यात येणार्‍या कपड्याच्या दर्जाचीही चाचणी करण्यात आली. प्रत्येकी दोन जोड गणवेश देण्यात येतील. त्यानंतर आगारातील कर्मचारी, अधिकारी आदींनाही गणवेश पुरवण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे.

महामंडळाच्या कर्मचार्‍यांना एसटीच्या इतिहासात प्रथमच तयार गणवेश मिळणार आहेत. याआधी महामंडळाकडून कर्मचार्‍यांना शिलाई भत्त्यापोटी 400 रुपये दिले जात असत. तयार गणवेश महामंडळाला 1 हजार 500 रुपयांना पडला.