Sun, Mar 24, 2019 23:45
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनधिकृत बांधकामे बेधडक पाडा

अनधिकृत बांधकामे बेधडक पाडा

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:26AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील अनधिकृत आणि धोकादायक बांधकामांविरोधात महापालिकेने जी धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्याला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा असून अनधिकृत बांधकाम कुठे असेल तर बेधडक कारवाई करा, कोणत्याही राजकीय दबावाला जुमानू नका, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केली. भीमा कोरेगाव हिंसाचाराविषयी योग्य वेळी बोलीन, असे त्यांनी सांगितले.

कमला मिल दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना भवन येथे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनधिकृत बांधकांच्या विरोधातील कारवाईबाबत शिवसेनेची भूमिका जाहीर केली. मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने छेडलेल्या कारवाईविषयी मी स्वत: आयुक्तांना सांगितलं आहे, कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता काम करा. 

कुठेही कारवाई करण्यापूर्वी प्रथम बांधकाम अधिकृत आहे की नाही याची खातरजमा करावी. मग ते बांधकाम कोणत्याही नेता असो किंवा कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्याच्याशी संबंध असो कारवाई करावी, शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

रूफ टॉप रेस्टॉरंट पॉलिसीला भाजपाचा विरोध असल्याचे सांगितले जाते. तसे पत्र देखील त्यांनी पालिकेला दिले असल्याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले असता, त्यांच्या डोक्यात काय आहे हे मला माहीत नाही. त्यांच्या टॉपला रूफ आहे की नाही, हे पहायला हवे, असा टोला त्यांनी लगावला.

आरोपींसाठी बक्षीस हे गृहखात्याचे अपयश

कमला मिल दुर्घटनेस आठवडा होत आला तरी या घटनेमागचे आरोपी सापडत नाहीत. त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावल जात हे पोलस व गृहखात्याचे अपयशच म्हणावे लागेल. आगीच्या घटनेतील आरोपींसाठी इनाम लावायला ते काय दहशतवादी आहेत? आपली यंत्रणा कूचकामी असल्याचेच यातून दिसून येत आहे. या प्रकरणात कुणाकडून राजकीय दबाव येतोय का? याची चौकशी झाली पाहिजे असे, ते म्हणाले.