Sat, Jul 20, 2019 03:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरचे जीन्सवॉश आता अंबरनाथमध्ये!

उल्हासनगरचे जीन्सवॉश आता अंबरनाथमध्ये!

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 12:59AMअंबरनाथ : प्रतिनिधी 

कोणतीही प्रक्रिया न करता जीन्स वॉशचे केमिकल वेस्ट थेट वालधुनी नदीत सोडल्याने वालधुनी पूर्णत: दूषित झाली आहे. हाच मुद्दा पुढे करून सर्वोच्च न्यायालयाने या जीन्स कारखान्यांवर बंदी घातली आहे. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या जीन्स कारखान्यांवर बंदी आल्याने त्यांनी आपला मोर्चा आता अंबरनाथ आणि बदलापूरकडे वळवला आहे. असे असतानाही या प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ दुर्लक्ष करत असल्याने या जीन्स कारखान्यांचे पुन्हा एकदा फावले आहे. 

उल्हासनगरातील बहुतांश जीन्स कारखाने हे वालधुनी नदीला लागून आहेत. त्यामुळे या जीन्स कारखान्यांतील केमिकल वेस्ट याच वालधुनी नदीपात्रात सोडले जात असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषित होत आहे. या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून वनशक्‍ती या संस्थेने न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेला जीन्स कारखाने बंद असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितल्याने महापालिकेने अखेर सर्वच कारखाने बंद केले आहेत.

अचानक पाचशेपेक्षा जास्त जीन्स कारखाने बंद झाल्याने मोठ्या आर्थिक उलाढालीवर गदा आली आहे. त्यामुळे या जीन्स कारखान्यांनी मुंबई व भिवंडी येथे आपले कारखाने स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा अंबरनाथ आणि बदलापूरकडे वळवला आहे. अंबरनाथ पश्‍चिमेकडे अशाप्रकारचे सुमारे 8 ते 10 कारखाने आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीन्स कारखाने सुरू होऊन अंबरनाथ आणि बदलापुरात जलप्रदूषण केले जात असले तरी या प्रकाराकडे एमपीसीबी दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. 

जीन्स वॉश केल्यानंतर प्रदूषित पाणी हे कारखानदार भुयारी गटार तसेच काही ठिकाणी जमिनीत खड्डा खोदून मुरवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. असाच प्रकार अंबरनाथमधील बुवापाडा येथे सुरू असल्याने या जीन्स कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.