Wed, Jul 17, 2019 18:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धवना खरंच आमची गरज आहे का?

उद्धवना खरंच आमची गरज आहे का?

Published On: Jun 17 2018 2:09AM | Last Updated: Jun 17 2018 9:05AMमुंबई : राजेश सावंत

आम्ही शिवसेनेच्या पायाचे दगड आहोत. आम्हाला पदे नको, आजही तलवार उचलण्याची ताकद आहे. कोणत्या कोचिन क्लासची गरज नाही. आम्ही निवृत्ती वेतन मागत नाही, सन्मान मिळावा हीच इच्छा.. पण खरच.. उध्दवजींना आमची गरज आहे का ? असा थेट सवाल शनिवारी ज्येष्ठ शिवसैनिकांनी आपल्या नेत्यांना केला.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढीसाठी आंदोलन करणार्या ज्येष्ठ शिवसैनिकांचे शनिवारी दादर येथील देवराज सभागृहात संमेलन संपन्न झाले. यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, लिलाधर ढाके, सतिश प्रधान, माजी महापौर महादेव देवळे, दिलीप नाबर बाळासाहेबांचे अंगरक्षक व 70 ते 75 च्या वयोगटातील सुमारे 250 शिवसैनिक उपस्थित होते. सुरूवातीला हा सोहळा घरगती असल्याचे दिसून आले. पण मनोहर जोशी यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ शिवसैनिकांचा ग्रुप का तयार झाला, असा प्रश्न केला. तुमच्या मनात काही शंका असतील तर विचारा असे सांगून ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही बोलले नाही. पण जोशी निघून जाताच शिवसैनिकांनी आपल्या मनातील खदखद अन्य नेत्यांसमोर बोलून दाखवली. जुन्या शिवसैनिकांना नेहमीच ओळखले गेले. आमचे प्रश्र्न नेतृत्वापर्यंत पोहचतील, हे माहित नाही.  शिवसेना वाढवण्यासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या. जेलमध्ये गेलो. पण कधीही पळ काढला नाही. बाळासाहेबांनी पाजलेले बाळकडू आजही रक्तात आहे. आम्ही आमदार खासदार, नगरसेवक एवढेच काय पक्षाचे पद मागत नाही.

साहेब नेहमी म्हणायचे शिवसेनेत दोन पदे आहेत. एक शिवसेनाप्रमुख व दुसरे शिवसैनिक त्यामुळे आम्हाला मानाने वागवा, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. तुम्ही प्रवाहातील शिवसैनिक आहात प्रसादाचे नाही, घराच्या बाहेर जेवढी जास्त चप्पल दिसतील ती तुमची श्रीमंती.. साहेबांची ही शिकवण आजही लक्षात आहे. त्यामुळे पदासाठी कधीही लाचार झालो नाही. आपलीच लोक आपल्या विरोधात बंड उभारतात, सामान्यासारखी वागणूक देतात, तेंव्हा दु:ख होते, असे परखड मतही शिवसैनिकांनी व्यक्त केले.  यावेळी शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांना बराच वेळ  समजवण्याचा प्रयत्न केला. साहेब म्हणाले होते. शिवसेना वाढली तर, त्याचा फायदा दुसर्या पिढीला होईल. तुम्ही ज्येष्ठ आहात त्यामुळे मान राखला गेलाच पाहिजे.  पण नेत्यांच्या समजवण्याचा काहीच फायदा झाला नाही. आज होऊन जाऊ दे.. या इर्षने शिवसैनिक पेटले होते. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजींना आमची खरच गरज आहे का, असा सवाल करत शिवसैनिकांनी नेत्यांना बुचकळ्यात टाकले. तब्बल दिड तास सुरू असलेल्या गप्पांमुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक नाराज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या शिवसैनिकांची उध्दव ठाकरे समजूत काढणार का याकडे सामान्य शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.