Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्तेच्या नको, सत्याच्या बाजूने उभे राहा!

सत्तेच्या नको, सत्याच्या बाजूने उभे राहा!

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:43AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सोमवारपासुन सुरू झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी विरोधक आपली शस्त्र परजत असतानाच आता सत्ताधारी शिवसेनेनेसुध्दा तोच पावित्रा घेतला आहे. सत्तेच्या बाजूने नाही तर सत्याच्या बाजूने उभे रहा, असा आमदारांना आदेश देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची कोंडी करण्याची खेळी आखल्याचे समजते. या रणनितीवरून सभागृहात शिवसेनासुद्धा एकप्रकारे विरोधकांना साथ देऊन भाजपला अडचणीत आणणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यापासून शिवसेनेने सरकारविरोधात आपल्या विरोधाची धार आणखी परजली आहे. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहून शिवसेनेनेही सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी इत्यादी मुद्यांवरून विरोधक विशेषतः भाजपला धारेवर धरणार आहे. अशावेळी सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळून जाऊ नये म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सर्व आमदार व खासदारांची हॉटेल ट्रायडंट या पंचतारांकीत हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक बोलविली होती. या बैठकीत त्यांनी सत्तेच्या नाही तर सत्याच्या बाजूने उभे रहावे, असे आदेश आमदारांना दिल्याचे समजते. 

राज्यातील शेतकर्‍यांना सरकारने 38 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. आतापर्यंत किती शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ झाला, किती रक्कम बँक खात्यात जमा केली याची आकडेवारी सरकारकडून घ्या, असे आदेशही त्यांनी या बैठकीत दिले. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार असल्याचे सांगून रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगाराची आकडेवारीही सरकारकडून मागा, असेही उद्धव यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते.