Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तर शिवपुतळ्यावर शिवप्रेमी छत्र उभारतील

तर शिवपुतळ्यावर शिवप्रेमी छत्र उभारतील

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:37AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कित्येक वर्षे झाली उन्हापावसात उभा आहे. हे आम्ही सहन करणार नाही. तुमची कुवत नसेल, तर शिवरायांच्या पुतळ्यावर शिवप्रेमी छत्र उभारतील. शिवसेना स्वत:च्या हिमतीवर विमानतळ परिसरात रायगडाची प्रतिकृती उभारेल, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवजयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळ परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून मानवंदना दिली. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, भारतीय कामगार सेनेचे सूर्यकांत महाडिक, विभागप्रमुख आमदार अ‍ॅड. अनिल परब यावेळी उपस्थित होते.

भारतीय कामगार सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले. पुतळ्यावर छत्र सावली उभारण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. ज्यांच्याकडे विमानतळ परिसराची जबाबदारी आहे, त्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी किंवा जीव्हीकेने हे काम केले नाही, तर शिवसेना त्यासाठी पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले.

शिवजयंती हा उत्सव केवळ  महाराजांच्या जन्मापुरताच मर्यादित नाही. तर हा दिवस म्हणजे 300 ते 400 वर्षांपूर्वी हा महाराष्ट्र हिरव्या अंधाराने व्यापला होता. त्यातून बाहेर काढून शिवरायांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला आहे. तो हा पुनर्जन्माचा दिवस आहे. हा केवळ एक दिवस नव्हे, तर हा एक सण आहे. तो सण अभिमानाने साजरा करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.