होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेची पूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

शिवसेनेची पूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

Published On: Dec 17 2017 6:00PM | Last Updated: Dec 17 2017 6:41PM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच खंबीरपणे उभी राहते. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची शिवसैनिक नेहमीच काळजी घेत असतो, असे असताना आम्ही नेवाळीच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर कसे सोडणार. नेवाळीच्या शेतकऱ्यांवर अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेनेची पूर्ण ताकद आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.  

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अंबरनाथ पंचायत समितीमध्ये नेवाळी गणातून नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच चैनू जाधव यांच्या पत्नी शिवसेना पुरस्कृत तेजश्री जाधव यांनी सर्वात जास्त मत मिळून विजय प्राप्त केला आहे. या निमित्ताने चैनू जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

यावेळी चैनू जाधव यांनी पक्ष प्रमुखांसमोर शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. नेवाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाळकावल्या आहेत. अर्थात सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्या आहेत. याबाबत चैनू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांचे अशा अनेक समस्यांद्वारे लक्ष वेधले. 

नेवाळीतील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हिवाळी आधीवेशनात आवाज उठवणार आहे, असेही या भेटीदरम्यान सांगण्यात आले. आंदोलन समितीने वारंवार संरक्षण मंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यामुळेच या आंदोलना हिंसक वळण लागले होते. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या वाहनांची जाळपोळ झाली होती. तर पोलिसांनी सुद्धा पॅलेट गनचा वापर केला होता. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे. इतके होऊनही आता निवडणुका झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही.

या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चैनू जाधव यांच्यासह पर्यावरण मंत्री रामदास कदम, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळराव लांडगे यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या पाठशी शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी ठाम असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी बोलताना दिली. ठाकरे यांच्या वक्तव्याचे पडसाद नेवाळी पंचक्रोशीत येऊन उमटताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.