Mon, Jun 17, 2019 04:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गणेशोत्सवाच्या आड आलात तर याद राखा : उद्धव ठाकरे

...तर याद राखा : उद्धव ठाकरे

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 10:38AMमुंबई : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या आड आलात तर याद राखा, रस्त्यारस्त्यावर उतरून महाआरती करू असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधींच्या मेळाव्यात दिला. ठाकरेंच्या या इशार्‍यामुळे नवाच प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

गणेशोत्सवासाठीचे मंडप तसेच अन्य बाबतीत कायद्याची बंधने आल्याने अनेक गणेशोत्सव मंडळे अडचणीत आली आहेत. विशेषतः गिरगावातल्या मंडळांना उत्सव साजरा करणे अशक्य झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि मनसे या मराठीवादी राजकीय पक्षांनी या मंडळांची बाजू घेतली आहे. शिवसेनेने तर आज या मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना उध्दव यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. आमच्या सण आणि उत्सवांच्या आड आलात तर शिवसेना रस्त्यावर महाआरत्या सुरू करेल, गणेशोत्सवाला विरोध करणारे हे सरकार हिंदूद्रोही आहे, राम मंदिर कधी होणार रामजाने, पण आमचे उत्सव तरी साजरे करू द्या अशी खरमरीत टीका उध्दव यांनी केली. 

राज्यात अस्वस्थता आहे. 50 वर्षात काय झाले यापेक्षा साडेचार वर्षात काय झा़ले ते बोला असे म्हणत त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी संप आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात सरकारवर टीकास्त्र सोडले. 

दरवर्षी उत्सवांच्याआड हे कायदे येतात, दरवर्षी असाच विरोध होतो, आता हे खपवून घेणार नाही, अ‍ॅट्रॉसिटीच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर केंद्र सरकारने कायदाच बदलला, आता राज्य सरकार उत्सवांसाठी असे का करीत नाही? 
- उद्धव ठाकरे