Sat, Mar 23, 2019 18:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोदी मनमोहन झाले : उद्धव

मोदी मनमोहन झाले : उद्धव

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:18AMमुंबई : खास प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून चौफेर हल्ले होत असतानाच मोदी हे मनमोहन झाल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे. एटीएममधील खडखडाट, कोसळती अर्थव्यवस्था आणि अन्य प्रश्‍नांवरून पंतप्रधानांना धारेवर धरताना आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले. हा काळाने भाजपवर घेतलेला सूडच म्हणावा लागेल. मोदी यांचा मनमोहन झाल्याचाच हा पुरावा आहे, असाही टोमणा ठाकरे यांनी मारला आहे.

मोदी हिंदुस्थानात मौनीबाबा असतात; पण परदेशात गेले की मात्र ते बोलके होतात. स्वदेशात घडणार्‍या घटनांची त्यांना उबग येते. मग ते परदेशात जातात व स्वदेशातील घटनांवर बोलतात. आमच्या पंतप्रधानांना देशातील बर्‍या-वाईट घटनांविषयी व्यक्‍त होताना पाहायचे असेल तर भारताची राजधानी लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस, जर्मनी येथे हलवा, नाहीतर दिल्लीचे रूपांतर हे सिनेमातील भव्य सेटप्रमाणे परदेशातील शहरात करा, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला आहे.

कठुआ आणि उन्‍नाव येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांमुळे देशभरात संताप व्यक्‍त केला जात असताना मौन बाळगून असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना धारेवर धरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लंडन येथे जाऊन हिंदुस्थानातील बलात्कार प्रकरणावर दुःख व्यक्‍त केल्याबद्दलदेखील उद्धव यांनी टीका केली आहे. 

मुलींवरील बलात्कार हा चिंतेचा विषय असून, ती देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. बलात्कारासारख्या घटनांवर देशाच्या पंतप्रधानांनी परदेशी भूमीवर बोलणे कितपत योग्य आहे,  असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.

Tags : Mumbai, NCP Modi criticism, Uddhav Thackeray, Samana editorial, Mumbai news,