Mon, Jan 21, 2019 17:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पगड्यांचे राजकारण करणार्‍यांचे डोके ठिकाणावर आहे काय?

पगड्यांचे राजकारण करणार्‍यांचे डोके ठिकाणावर आहे काय?

Published On: Aug 14 2018 1:47AM | Last Updated: Aug 14 2018 1:47AMमुंबई : खास प्रतिनिधी

लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांच्या पगड्यांचेही राजकारण करणार्‍यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. अलीकडेच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवार यांनी भुजबळ यांच्या डोक्यावर फुले पगडी घालत यापुढे पुणेरी नव्हे, तर याच पगडीने स्वागत करा, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्याचाच संदर्भ घेत ठाकरे यांनी आज पवारांवर टीका केली. 

मुंबई मराठी पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू केलेल्या सन्मान योजनेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. यावेळी बोलताना उद्धव यांनी आजच्या पत्रकारितेचा समाचार घेतला. लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांचे कार्य विसरून त्यांच्या पगडीचे राजकारण करण्यातच आज धन्यता मानली जाते आहे, असा टोला पवारांना मारला. 

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ डळमळीत होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असून जिथे इंदिराजींची आणीबाणी उखडून फेकली, इंग्रजांची गुलामगिरी उखडून फेकली, तिथे चोरपावलांनी दुसरी आणीबाणी येत तर नाही ना, असली फालतू चर्चा करू नका, तुटून पडलो तरी चालेल, ती आणीबाणी तोडून टाकली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.