होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपाच्या दुराग्रहाने युती लटकली

भाजपाच्या दुराग्रहाने युती लटकली

Published On: Feb 12 2019 1:25AM | Last Updated: Feb 12 2019 1:25AM
मुंबई : खास प्रतिनिधी 

एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती व्हायलाच हवी असे बोलताना 48 पैकी 43 जागा जिंकण्याच्या गर्जना करण्याच्या भाजपच्या दुटप्पी धोरणांमुळेच महाराष्ट्रात युती लटकलेल्या अवस्थेत असल्याचा दावा  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. स्वबळावर लढणार असल्याचे वारंवार ठासून सांगणार्‍या उध्दव यांनी पहिल्यांदाच युती भाजपामुळेच लटकलेली असल्याचे सामनातील अग्रलेखातून म्हटले आहे. याच अग्रलेखात शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. 

2014 च्या निवडणुकीत भाजपानेच युतीच्या अस्थिरतेची बीजे रोवली होती. आजही युती लटकण्यामागे हीच पापाची बीजे असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. राजकारण करणार्‍या सगळ्यांनाच सत्ता हवी असते, मात्र चोवीस तास त्याच नशेत राहून झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही.  याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. युतीचे एकदा नक्की काय करायचे ते ठरवा. भरकटल्यासारखे बोलत राहिल्याने लोकांतील उरलीसुरली पतही निघून जाईल.

कांद्याला फक्त साडेसात पैसे भाव मिळत आहे. दुधावरील जीएसटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अनाथाश्रमांच्या दत्तक केंद्रांमध्ये गेल्या चार वर्षांत एक हजारावर बालकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शिक्षकांच्या 24 हजार रिकाम्या जागा भराव्यात म्हणून शिक्षकवर्ग उपोषणाला बसला आहे. यापैकी एकाही प्रश्नावर सरकारकडे तोडगा नाही, पण महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा तोडगा यांच्यापाशी आहे. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, अशी यांची भूमिका असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मबलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला. खरे तर महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे 48 जागा हे लोक सहज जिंकू शकतात आणि देशात स्वबळावर 548 जागा कुठेच गेल्या नाहीत. पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? याचे उत्तर द्या, अशा शब्दात उध्दव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.