Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव ठाकरेंविरुद्ध मुख्यमंत्री आयोगाकडे!

उद्धव ठाकरेंविरुद्ध मुख्यमंत्री आयोगाकडे!

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:49AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असताना शिवसेना — भाजप या मित्रपक्षांमधील संघर्ष अधिकच पेटला आहे. निवडणूक प्रचारात वाजवण्यात आलेल्या आपल्या ऑडीओ टेपशी छेडछाड केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

केंद्रातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी दादरच्या भाजप कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद घेतली. टेपच्या वादावर ते म्हणाले, आपण आपली पंधरा मिनिटांची मूळ ऑडीओ क्‍लीप निवडणूक आयोगाला पाठविली आहे. या क्‍लीपमध्ये छेडछाड करुन चार मिनिटांची ऑडीओ क्‍लीप शिवसेनेने तयार केली. या क्‍लीपव्दारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण या क्‍लीपमध्ये काहीही चुकीचे बोललो नाही. क्‍लीपमध्ये अशी छेडछाड करणे हा गुन्हा असून या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आयोगाला केली आहे. मी काही आक्षेपर्ह बोललो असेल तर आयोगाने माझ्यावर कारवाई करावी. अन्यथा ज्यांनी क्‍लिपमध्ये छेडछाड केली त्यांच्यावर कारवाई करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

साम, दाम, दंड, भेद याचा अर्थ शिवसेनेने आपल्याला हवा तसा लावला. आपण कुटनीती या अर्थाने हा शब्द वापरला असे मुख्यमंत्री म्हणाले. 

केंद्रातील भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाले आहेत. या काळात केंद्राने केलेली कामे पहाता या यशाचे श्रेय जसे भाजपचे आहे तसेच या सरकारमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांचेही आहे. काही पक्षांना हे यश मान्य नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. यशाचे भागीदार होण्यापेक्षा काहीजण टीकेत रमले आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी सेनेला लगावला. तसेच खासदार संजय राऊत यांना भाजपच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. माध्यमांमध्येच त्यांना महत्त्व दिले जाते, असेही ते म्हणाले.

शिवसेनेसारखे भाजपचे हिंदुत्व हे संकुचित नाही. हिंदुत्व काही धर्माचा भाग नाही, तर ती जीवनपद्धती आहे. जो या देशाला आपले मानतो तो हिंदु आहे. हिंदुत्व हा कोणा धर्माचा द्वेेष नाही, असा हल्ला शिवसेनेवर चढवितानाच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवसेनेने आम्हाला शिकवू नये. शिवसेनेच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत आलो आहोत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही त्यांनी शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला.