होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अडीच तास वेटिंग; ठाकरे-फडणवीस भेट रद्दच

अडीच तास वेटिंग; वाघ-सिंह भेट रद्दच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : खास प्रतिनिधी

आगामी निवडणुकात वाघ आणि सिंह एकत्रच राहतील आणि वाटेत येणार्‍या उंदरांचा बंदोबस्त करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठासून सांगितले असले, तरी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या वाघाला तब्बल अडिच तास वाट पाहून गुहेत परतावे लागले! शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी विधानभवनात येणार होते, मात्र मुख्यमंत्री नेमके त्यावेळी सभागृहात व्यस्त झाल्याने उध्दव यांना शिवालयातूनच माघारी जावे लागले. उद्धव यांची वाट पहात थांबून राहीलेल्या शिवसेनेच्या आमदारांची  मात्र त्यामुळे निराशा झाली. राज्यसभेचे खासदार नारायण राणे मात्र मुख्यमंत्र्यांची वाट पहात विधानभवनात बसले, आणि त्यांची भेट झाल्यावरच बाहेर पडले.    

शिवसेनेच्या आमदारांची गार्‍हाणी घेऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे शिवसेनेकडुन सांगण्यात आले होते. पुष्पगुच्छ वगैरे सगळी तयारी झाली होती. फोटोग्राफरदेखील गेटकडे कॅमेरे रोखून बसले होते. तेवढ्यात एक मर्सिडिझ गेटवर थांबली, आणि आले, असा गलका कॅमेरामन्सनी केला. शिवसेनेचे आमदार-मंत्री गुच्छ घेऊन पुढे धावले, आणि तेवढ्याच वेगाने माघारी फिरले. राज्यसभा खासदार नारायण राणे मोटारीतून उतरले होते. आपल्या खास स्टाइलने राणेंनी  विधानभवनात एन्ट्री घेतली. शिवसेनेचे आमदार-मंत्री मात्र त्यांच्याकडे पहात आणि पुन्हा गेटकडे डोळे लावून उभे होते. राणे अध्यक्षांच्या चेंबरमध्ये वाट पहात बसले, आणि मुख्यमंत्री सभागृहातून आल्यानंतर त्यांची भेट घेतली. 

संबंधित : ठाकरेंना वेटिंग करायला लागले चुकलेच : मुख्यमंत्री

उध्दवजी शिवालयात आहेत, आणि कोणत्याही क्षणी येतील असे सेनेचे नेते सांगत होते, पण तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचे सभागृहात भाषण सुरू झाले. भाषण बरेच लांबल्याने वाट पाहून उध्दव ठाकरे शिवालयातूनच घराकडे रवाना झाले. 

उध्दव परत गेल्याचे समजताच मिडयिामध्ये चर्चा सुरू झाली, मात्र सेनेचे काही आमदार मात्र, दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले, आणि भेटता न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, असे सांगत होते. 

वाचा : शिवसेना आमदारांची झाली गंमत

उद्धव ठाकरे यांनीच भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार ते संध्याकाळी पाच वाजता येणार होते. मात्र आपल्याला उशिर होत असून सहा वाजता येतो, असे ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री कार्यालयाला कळवण्यात आले. मात्र, सभागृहात त्याचवेळी चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जावे लागले, आणि या वाघ-सिंहाची भेट आज तरी टळली.

शिवसेना सरकारवर सातत्याने टिका करीत आहे. सामनातून रोज सरकारला धारेवर धरले जात आहे. असे असूनही भाजपाने आगामी निवडणूकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी स्वतःहून नमते घेतले होते. त्यानंतर सेनेनेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले होते. आजची भेट ही त्याचाच भाग होतीू, असे सांगितले जाते. आज ती टलली असली, तरी लवकरच हे नेते भेटतील असे सेनेच्या एका नेत्याने सांगितले.

Tags : mumbai news, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, visit, finally canceled,


  •