होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु; तिघांच्या कोठडीत वाढ

आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु; तिघांच्या कोठडीत वाढ

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 12:59AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

उदयोमुन्ख क्रिकेट खेळांडूच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी विजय गोपाळ बर्‍हाडे याच्या आर्थिक व्यवहाराची सध्या प्रॉपटी सेलकडून चौकशी सुरु असून फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधीचा घरात जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या तिघांच्या अटकेनंतर आणखी काही खेळाडू तक्रारीसाठी पुढे येत आहेत. 

विजय बर्‍हाडे याने सनराईज हैद्राबाद या आयपीएल टिमशी एक वर्षांसाठी करार होता. या करारात त्याने काही उदयोमुन्ख खेळांडू शोधून त्यांची माहिती संबंधित कंपनीला देण्याचे आश्‍वासन दिले होते.

मात्र करार एक वर्षांनी संपल्यानंतर तो कंपनीशी संबंधित असल्याचे भासवून अनेक उदयोमुन्म खेळाडूंना आयपीएल, रणजी ट्रॉफी आणि ईस्ट आफ्रिका प्रिमिअर लिगमध्ये (ईएपीएल) संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवित होता. त्यासाठी त्याने या खेळांडूकडून सुमारे 68 लाख रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी एकालाही संघात स्थान मिळवून दिले नाही. याप्रकरणी चेंबूर पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास प्रॉपटी सेलकडे वर्ग करण्यात आला. हा तपास हाती येताच विनायक मेर यांच्या पथकातील रहिमतुल्ला सय्यद, संतोष गायकर, दिप बने, सुनिल माने, लक्ष्मीकांत साळुंखे या पथकाने पुणे, ठाणे आणि भुसावळ येथून विजयसह जीवन मुकादम आणि दिनेश मोरे या तिघांना अटक केली. सध्या हे तिघेही पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले असता कोठडीत 6 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. 

विजयने एका क्‍लबची स्थापना केली होती. त्याचे कार्यालय दक्षिण मुंबईत असल्याचे सांगितले, मात्र तिथे त्याचे कार्यालयच नसल्याचे उघडकीस आले आहे. या क्‍लबच्या नावाने त्याने बँकेत एक खाते उघडले असून त्यात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या व्यवहाराची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 68 लाखांची फसवणूक झाल्याचे खेळांडूच्या जबानीतून उघडकीस आले आहे. मात्र हीच रक्कम कोट्यवधीच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. विजय मुंबईसह दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गोवा, जयपूर, कर्नाटक येथील क्रिकेट खेळाडूंच्या संपर्कात होता असे त्याच्या कॉल रेकॉर्डवरुन उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.